Sanjay Raut On Congress : विधानसभेची निवडणूक जाहीर (Maharashtra Assembly Election 2024) झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघात काँग्रेसनेही उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चर्चा सुरु झाली आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. “ही ‘टायपिंग मिस्टेक’ असेल. पण अशा ‘टायपिंग मिस्टेक’ आमच्याकडूनही होऊ शकतात”, असा सूचक इशारा राऊतांनी काँग्रेसला दिला.

संजय राऊत काय म्हणाले?

“शिवसेना ठाकरे गटासह आमच्या मित्रपक्षाचेही समाधन होईल, अशा प्रकारे जागावाटप होईल. मात्र, फॉर्म्युल्यासंदर्भात ज्या वेगळ्या काही बातम्या येत आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही सर्वजण एकत्र लढत आहोत. मात्र, आम्हाला पाहायला मिळालं की, सोलापूर दक्षिण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला. त्या मतदारसंघात काँग्रेसच्या यादीत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पण मी असं मानतो की, ही टायपिंग मिस्टेक असेल. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात”, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा : मविआतील जागा वाटपात ‘टायपिंग मिस्टेक’, संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी!

राऊत पुढे म्हणाले, “दिग्रजच्या जागेबाबत आम्ही आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली आहे. दिग्रजमधून आमचा उमेदवार निवडणूक लढणार नाही. माणिकराव ठाकरे यांच्यासाठी आम्ही ती जागा सोडली. यासंदर्भात बाळासाहेब थोरात आणि रमेश चेन्नीथला यांच्याशी चर्चा झाली. मग दिग्रजच्या ऐवजी दर्यापूर हा मतदारसंघ काँग्रेसने आम्हाला दिलेला आहे. आता भूम-परंडा मतदारसंघाविषयी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही वाद नाही. तेथे थोडे आमचे मतभेद आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला ती जागा एकमेकांमध्ये बदलण्यात यावी, यासंदर्भात चर्चा झालेली आहे. पण त्यामधून मार्ग निघेल. मात्र, सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच मिरजमध्येही काँग्रेसमचे लोक उमेदवार देणार असल्याचं माझ्या कानावर आलं. असं जर झालं तर तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अडचणी निर्माण होतील. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं की तिनही पक्षांनी एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा”, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

सोलापूर दक्षिणबाबत ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये वाद काय?

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, दक्षिण सोलापूरमधून दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. सोलापूर दक्षिणसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने अमर पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सोलापूर दक्षिणच्या जागेबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी काँग्रेसला मोठा इशारा दिला आहे.

Story img Loader