Sanjay Raut : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता सरकार स्थापन होऊन काही दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यातच महायुतीमध्ये गृहखात्यावरून रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. असं असतानाच आता महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपा महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस करू शकतं. कारण त्यांच्याकडे पैसा आणि यंत्रणा आहे, असं सूचक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, “भारतीय जनता पक्ष असं कोणतंही ऑपरेशन लोटस करू शकतं. कारण त्यांच्याकडे पैसे आणि यंत्रणा आहे. याआधीही अशा प्रकारे माणसं फोडलेले आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेले? भिती पोटीच गेले ना? ते पण ऑपरेशन लोटस नव्हतं तर ऑपरेशन डर होतं. त्यामुळे ते घाबरून तिकडे गेले”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा : Maharashtra News Live : “सभापती जगदीप धनखड पक्षपातीपणे वागतात”, खासदार संजय राऊत यांचा आरोप
“भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे असं सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही. आता २० दिवसानंतर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल. गृहखातं कोणाकडे द्यायचं हे ठरत नसेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
‘फडणवीसांना अशा प्रकारे राज्य चालवायचंय का?’
“बीड जिल्ह्यातील केजमधील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्यांचं अपहरण झालं आणि हत्या झाली. तसेच पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचंही अपहरण करून हत्या करण्यात आली. तसेच भाजपाचे काही आमदार ज्या प्रकारे धमक्या देत आहेत. मान खाली घालवणारी भाषा वापरतात. जर भरदिवसा एका सरपंच असणाऱ्या व्यक्तीचं अपहरण होत असेल तसेच सतीश वाघ यांच्यासारख्या एका उद्योजकाला मारलं जात असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. मग देवेंद्र फडणवीस यांना अशा प्रकारे राज्य चालवायचंय का? हे त्यांनी स्पष्ट करावं”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.