Sanjay Raut On Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. सभा, मेळावे, आढावा बैठका सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने पुण्यात आज शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत आणि जागा वाटपांबाबतही भाष्य केलं. तसेच शेरोशायरी करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार फटकेबाजी केली. “ये हसता हुआ चेहरा ही कुछ लोगों के जलने का कारण है!”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत काय म्हणाले?
“माझ्या समोर बॉस बसलेले आहेत आणि मला बोलायला लावलं. आता वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं की गर्जना करा. मी असं बोलल्यानंतर उद्धव ठाकरे हसत आहेत. मात्र, त्यांच्या हसत्या चेहऱ्याचा अर्थ मी एका ओळीत सांगतो. ये हसता हुआ चेहरा ही कुछ लोगों के जलने का कारण है! या महाराष्ट्रात जी आग लागलेली आहे. ती आग उद्धव ठाकरेंच्या या हसण्यामुळे लागली आहे. एवढं सर्व घडत आहे, आपला संघर्ष सुरु आहे. अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. आम्हाला लढण्याची प्रेरणा यामधून मिळत आहे. त्यामुळे समोर सत्ताधाऱ्यांची जळफळाट सुरु आहे. त्याचं कारण उद्धव ठाकरे यांचं हसणं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : “महात्मा सचिन वाझे कोण आहे? देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन…”, संजय राऊत यांचा आरोप
शिवसेनेत प्रत्येक जागा लढवण्याची ताकद
“आपण कोणत्या जागा लढवायच्या आहेत, याची यादी माझ्याकडे तयार आहे. पुणे, मावळ, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढवण्याची ताकद शिवसेना ठाकरे गटामध्ये आहे. गेल्या २५ ते ३० वर्षात या प्रत्येक जागांवर एकदा तरी शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. शिवसेनेने दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या आहेत. कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली. त्यांचे आमदार निवडून आणले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचा आमदार निवडून आणला. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय व्हावा, यासाठी शिवसैनिकांनी रान पेटवलं. लोकसभेच्या निवडणुकीतही शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं”, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
“विधानसभेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीत जरी असलो तरी पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत. यासाठीच आपला हा मेळावा आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांना एक मंत्र दिला. तो मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. एक तर तुम्ही राहताल किंवा मी. आरे तुम्ही राहताल किंवा मी हे सांगणारे नेते उद्धव ठाकरे आहेत”, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली.