Aaditya Thackeray On Compulsory Hindi In Maharashtra: महायुती सरकारने नुकतेच राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून मराठी आणि इंग्रजीसह हिंदी भाषाही शिकवण्याबाबात अध्यादेश काढला आहे. सरकारच्या राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अनेकांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आज आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पाणी टंचाई, पर्यावरण आणि झालांच्या कत्तलीवर भाष्य केले. तसेच शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सरकराने घेतलेल्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा आहे की विरोध असा प्रश्न विचारण्यात आला होता.

कदाचित असा डाव असू शकतो…

या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “याबाबत थोडेसे सविस्तर उत्तर देणे गरजेचे आहे. या निर्णयाकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहायचे असेल तर योगायोग बघा, परवा ज्या भेटीगाठी झाल्या, एकमेकांना आधार देण्यासाठी असतील, एकमेकांना आयडिया देण्यासाठी असतील किंवा ऐकमेकांना पुर्नजन्म देण्यासाठी असतील. यातून एकच दिसते, कदाचित असा डाव असू शकतो, बिहारची निवडणूक येत आहे भाजपाला तिथे गरज आहे. नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या आम्ही मराठीचा घेतो. दोघांचा फायदा लोकं मरतील यात आपले काय. आपले तर नीट चालेल असा विचार असू शकतो.”

प्रगतीसाठी जास्तीत जास्त भाषांचे ज्ञान आवश्यक

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “दुसरी गोष्ट, आमचे मत स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात सर्वांना मराठी आलेच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे ती इंग्रजी. कारण ही जागतिक भाषा आहे. तिसरी भाषा मग हिंदी असेल किवा इतर कोणती हे शिकणे महत्त्वाचे आहे. कारण ज्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्यांची प्रगतीही जास्त होते.”

सनदी अधिकाऱ्यांचे उदाहरण

“आपल्याकडे सर्वात कठीण परीक्षा कोणती असते तर ती यूपीएससीची. तुम्ही कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याकडे पाहा. त्यांना मातृभाषा येते इंग्रजी येते, हिंदे येते आणि ते ज्या ठिकाणी सेवेत असतात तेथील स्थानिक भाषाही येते”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.