मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्याविरोधात छगन भुजबळ यांनी शड्डू ठोकले होते. कारण ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. त्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले. भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळावे आयोजित करून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेतल्या. मात्र मागच्या तीन सभांना त्यांनी उपस्थिती लावलेली नाही. त्यांचे सहकारी आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भुजबळ आता सरकारी पातळीवर लढाई लढतील आणि आम्ही मैदानात लढाई लढू. पण भुजबळांच्या गैरहजेरीवर आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली आहे.
“मराठा समाजाला आरक्षण द्यावं, पण ओबीसींवर अन्याय झाला तर…”; छगन भुजबळ यांचा इशारा
माध्यमांशी बोलत असताना भास्कर जाधव म्हणाले, “छगन भुजबळ यांना भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ओबीसींची बाजू घेऊन लढा, असे सांगितले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठ्यांची बाजू घेण्यास भाजपाने सांगितले गेले. त्यातून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही जामीनावर बाहेर आहात, हे लक्षात ठेवा, असेही भुजबळांना सांगण्यात आले होते. त्यामुळे छगन भुजबळ उसने अवसान आणून लढत होते. पण लढाई जिंकण्यासाठी उसने अवसान आणून चालत नाही, हे कळल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं.”
मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा निघालाच पाहीजे, असंही भास्कर जाधव म्हणाले. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला स्पर्श करत मी मराठ्यांना आरक्षण देणारच, असा शब्द दिला होता. वर्तमान राज्यकर्त्यांनी फसवणुकीचा उद्योग केला असल्यामुळे मराठा समाजाचा हा उद्रेक झाला, असेही भास्कर जाधव म्हणाले. तसेच ओबीसी समाजाने संयम बाळगावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आरक्षण द्यावे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असेही भास्कर जाधव म्हणाले.
तर ओबीसीही आंदोलनाला उतरतील
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत आल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कायद्याचा कसोटीवर जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांमध्ये काय आहे, ते सरकार पाहतं आहे. मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये. या मतावर आम्ही ठाम आहोत. जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला, हे लक्षात आलं तर निश्चितपण ओबीसींचंही आंदोलन सुरु होईल. मला वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करुन योग्य निर्णय घेतील. जी आमची मतं आहेत ती आम्ही सभांमधून मांडत असतो. मात्र ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करु.”