शिवसेना उबाठा गटाचे रत्नागिरीमधील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. अनेक तास त्यांच्या घरात धाडसत्र सुरू असून साळवी यांच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. त्यानंतर राजन साळवी यांच्याकडे साडे तीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगून एसीबीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच ही तर विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि शिंदे गटाचाही उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्याकडे बेहिशेबी संपत्ती नाही

आमदार राजन साळवी माध्यमांशी बोलत असताना आपल्या कारकिर्दीचा आढावा त्यांनी दिला. ते म्हणाले, १९८२ ते १९९२ पर्यंतमी सरकारी नोकरी केली. त्याचा पगार मला मिळत होता. १९९२ साली मी नोकरी सोडून रत्नागिरीमध्ये झेरॉक्सचे दुकान थाटले. त्यानंतर १९९७ साली रत्नागिरीत हॉटेल आणि परमीट रुमचा व्यवसाय सूरू केला. तेव्हापासून मी हॉटेल व्यवसायात आहे. तसेच मी आंबा बागायतदारही आहे. २००९ साली मी पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हापासून या पदावर आहे. तीन दशकांपासून व्यवसाय करत असताना मी नियमानुसार कर भरत आलो आहे. मग तरीही माझ्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा साडे तीन कोटींची अधिक संपत्ती कशी काय दाखविली? असा प्रश्न राजन साळवी यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> “मला अटक करा, पण माझ्या पत्नी आणि मुलावर…’, एसीबीचे छापे सुरू असताना राजन साळवींची प्रतिक्रिया

राजन साळवी पुढे म्हणाले, “आतापर्यंत सहावेळा मी एसीबीकडे चौकशीसाठी गेलो आहे. माझे सीए आणि मी त्यांना वेळोवेळी पुरावे देत आलो आहोत. पण माझ्यावर गुन्हा दाखल करायचाच, या हेतूने ही कारवाई सुरू आहे. मी बँकाकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे माझ्याकडे साडे तीन कोटींची संपत्ती नाही, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत अधिकारी माझ्या घरातून जात नाहीत, तोपर्यंत माझे कार्यकर्ते माझे घराबाहेर थांबणार आहेत. आणखी कार्यकर्ते इथे येण्यासाठी निघाले आहेत. अधिकारी वर्ग कार्यकर्ते जाण्याची वाट पाहत आहेत, म्हणजे मला रात्री अटक करता येईल.”

मी सरकारला घाबरत नाही

दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते की, जे खोके-खोके ओरडत होते, त्यांच्या घरात आज खोके सापडत आहेत. या टीकेला प्रत्युत्त देताना राजन साळवी म्हणाले, माझ्या जुन्या घरी सकाळपासून चौकशी सुरू आहे. तिथे काही खोके सापडले असतील, सोने-नाणे किंवा मौल्यवान वस्तू सापडल्या असतील तर मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पण माझ्या घरात असे काही मिळू शकत नाही. सापडले असेल तर अधिकारी सर्वांसमोर ते ठेवतीलच. पण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना त्रास द्यायचा, या हेतूनेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारने ठरवून ही कारवाई सुरू केली आहे. रवींद्र वायकर यांच्याविरोधात ईडीची चौकशी, वैभव नाईकची चौकशी, तसेच नितीन देशमुख यांचीही चौकशी सुरू आहे. कोकणातील एक लढवय्या आमदार (राजन साळवी) आमच्याबरोबर येत नाही, यासाठी शिंदे सरकारने ही कारवाई केली आहे, पण या कारवाईला मी घाबरत नाही, असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा >> “ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर…”, एसीबीचे छापे पडल्यानंतर राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

ही तर विजयाची नांदी

राजन साळवी पुढे म्हणाले की, २०२ हे निवडणुकांचं वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये जनता शंभर टक्के या सरकारला मातीत मिळवतील, हा मला विश्वास आहे. त्यामुळेच मला वाटतं २०२४ च्या विजयाची ही नांदी आहे. म्हणूनच आमच्यावर दबाव टाकण्यासाठी अशा कारवाया केल्या जात आहेत. पण मी शरणागती पत्करणार नाही. महाराष्ट्रात असे अनेक आमदार आहेत, ज्यांच्याकडे कोट्यवधी, अब्जावधींची मालमत्ता आहे. पण त्यांना मीच दिसलो.

तुम्हीही शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जाते, असा प्रश्न माध्यमांनी यावेळी राजन साळवी यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, एकनाथ शिंदे ज्या दिवशी ५० आमदार घेऊन गेले, तेव्हापासून रोज बातमी येते की, राजन साळवीही शिंदे गटात जाणार. पण मी अद्याप शिंदे गटात गेलेलो नाही. आमच्या निष्ठा शिवसेनापक्षप्रमुखांच्या चरणी आहेत.