Anil Parab on Chhava: सध्या छावा चित्रपटाचा चांगलाच बोलबोला आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झाले आहे. तसेच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या अत्याचाराबद्दलही अनेकांनी हळहळ व्यक्त केली. विधानपरिषेदत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना शिवसेनेचे (ठाकरे) नेते, आमदार अनिल परब यांनी छावा चित्रपटाचा विषय काढला. “छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अत्याचार झाले, तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच माझ्यावरही तुरुंगात अत्याचार झाले, पण मी पक्ष बदलला नाही”, असे विधान अनिल परब यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले अनिल परब?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील सहकाऱ्यांना घेऊन नुकताच छावा चित्रपट पाहिला. पण राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख आढळला नाही. तसेच तुम्ही छावा बघता, तर मला पण बघा, असे विधान शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी केले. विधानपरिषदेत बोलताना ते म्हणाले, “धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. मी सगळे भोगले, पण पक्ष बदलला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की, लगेच गेले पक्ष सोडून.”

अनिल परब म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सत्ताधारी बाकावरून बरेच बोलले गेले. धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. त्यांचे डोळे काढले, हात-पाय छाटले. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. ते आपल्या मतावर ठाम राहिले. छळ झाला तरी दबावाला बळी पडले नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा मी चालवला आहे. पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला. ईडीची नोटीस, सीबीआय, प्राप्तिकर विभाग अशी विविध कारवाई माझ्यावर करण्यात आली.”

मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले, ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे, अशीही टीका अनिल परब यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिभाषणात लिहिले की, त्यांचा मान-सन्मान राखला जाईल. पण प्रशांत कोरटकर आणि राहूल सोलापूरकर हे महाराजांचा अपमान करतात, तेव्हा त्यांचा विरोध करण्याची सरकारची हिंमत होत नाही. पण राज्यपालांना चुकीची माहिती देण्याचे काम सरकार करत आहे, असाही आरोप अनिल परब यांनी केला.

भाजपाकडून तीव्र निषेध

“अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज माझ्या हृदयात आहेत. म्हणूनच संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा अधिग्रहीत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे”, असे विधान भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी आपल्या विधानपरिषदेतील भाषणात केले. तसेच भाजपाकडून शुक्रवारी (७ मार्च) अनिल परब यांच्या विधानाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

Live Updates