Sanjay Raut on Communal Tension: “भारतात १९४७ पूर्वी निर्माण झालेली परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये मला फारसा फरक दिसत नाही. जेव्हा पाकिस्तानची निर्मिती होत होती, तेव्हा देशात काही लोकांनी हीच परिस्थिती निर्माण केली होती. पंडित नेहरूंनी त्याचवेळी सांगितले होते की, भारताचा मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. याचा अर्थ धर्मांधाच्या हाती देश जाऊ देणार नाही. आज दुर्दैवाने देश त्याचप्रकारच्या लोकांच्या हाती गेला आहे. संघ परिवाराचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले असून ते फक्त दंगली घडविणे, मशिदीवर हल्ले करणे अशी कृत्य करत आहेत”, अशी भूमिका शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण सरकारमधील मंत्री हलाल आणि झटका मटण यावर वातावरण दुषित करत आहेत. राज्य चालविण्याची ही कोणती पद्धत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ज्या शेतकऱ्यांचा जीव गेला, ते हिंदू नव्हते का? संघ, बजरंग दल यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे का? असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, “देशात आज चांगले वातावरण नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता इफ्तार पार्टीचे आयोजन करतात आणि तिथे जातात. पण महाराष्ट्रात भाजपाचे नेते इफ्तार पार्टीचा विरोध करत आहेत. हे कोणत्या प्रकारचे दुटप्पी राजकारण आहे? महाराष्ट्रातील भाजपाने नेते रोज मुस्लीम समाजाविरोधात गरळ ओकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत त्यांची भूमिका काय आहे? हे स्पष्ट केले पाहिजे. या देशात दंगली उसळाव्यात असे भाजपाचे मनसुबे असतात. जोपर्यंत दंगली होत नाहीत, तोपर्यंत ते निवडणुका जिंकत नाहीत.”

भाजपा-संघाला शिव्या घालणारेच आज भाजपामध्ये

यंदा होळी आणि रमजान एकत्र आले. दोन्ही सण एकत्र आले म्हणून काही बिघडत नाही. दोन्ही धर्माच्या लोकांनी संयम बाळगला पाहिजे. अनेकांनी तो बाळगलाही. पण महाराष्ट्रात कालपर्यंत इतर पक्षात असलेले आज नवहिंदुत्ववादी बनले आहेत. कालपर्यंत भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि स्वा. सावरकर यांना शिव्या देणारे आज भाजपात येऊन पावन झाले आहेत. आज त्यांची जी भाषा आहे, ती योग्य नाही. अशापद्धतीने देश अखंड राहणार नाही. एकाबाजूला अखंड हिंदुस्थानची भाषा बोलायची आणि दुसरीकडे दोन गटांना तोडण्याचे काम सुरू आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, अशी परिस्थिती १९४७ पूर्वीही देशात निर्माण झाली होती. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, मी भारतात दोन राष्ट्र पाहत आहे. हे ठीक होत नाही. भाजपात नव्याने आलेले नेते देशातील वातावरण खराब करण्याचे काम करत आहे.

हिंदुत्वाला झटका बसेल

संघाला हाफ चड्डीवाले म्हणणारे, देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालणारे आज आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. मटणाची वेगवेगळी दुकाने करणारे हे कोण? देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसे करत आहेत? सरसंघचालक भागवत हे कसे सहन करत आहेत. अशाप्रकारच्या हलाल आणि झटक्यामुळे हिंदुत्त्वाला झटका बसेल, असेही संजय राऊत म्हणाले.

Live Updates

Story img Loader