Sanjay Raut Slams Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपाला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. भाजपाने या निर्णयाचे स्वागत केले असले तरी महाविकास आघाडीमधील पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांची कोणती फाईल उघडली, ज्यामुळे त्यांच्या नवनिर्माण पक्षाचे नमोनिर्माण झाले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा कशासाठी?
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मनसेवर टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत खोक्याचे राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार मोदी-शाह आहेत. अशावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. याची उत्तरे त्यांनी दिली पाहीजेत, असं काय झालं की तुम्हाला अचानक महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला. तुमचा नमोनिर्माण पक्ष कसा झाला? नमोनिर्माण होण्याची गरज का पडली? त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत.”
आम्ही भाजपाचा जबडा फाडून बाहेर पडलो
शिवसेनेनेही भाजपाबरोबर युती केल्याचा दाखला राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना दिला होता. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपाबरोबर राहिलो नाहीत. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती केली होती. ती युती २५ वर्ष टिकली. पण भाजपाने खरे दात दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घेतल्या. जर कुणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावत असेल तर शिवसेना त्याचा प्रतिकार करेल.”
कीर्तिकुमार शिंदेंचा मनसेला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांचं..”
तुम्हीही त्या ओवाळून टाकलेल्या नेत्यांपैकी आहात का?
महाराष्ट्रात सध्या राजकीय व्याभिचार सुरू आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला होता. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. “राजकीय व्याभिचार काय असतो? हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणातून समजून घेतले पाहीजे. आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार माननारे लोक आहोत. राज्यातील ओवाळून टाकलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपाने आपल्यात सामावून घेतले. त्यातले हे एक महाशय आहेत का? पण तसे मला वाटत नाही. राज्यातले सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड यांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणे हा व्याभिचार नाही का? त्याच व्याभिचारी व्यासपीठावर तुम्ही पाऊल ठेवले असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल”, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.