Sanjay Raut: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले म्हणाले, “आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असे पटोले म्हणाले होते. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून एकनाथ शिंदे हे सत्तास्थापनेनंतर काही काळ नाराज असल्याची चर्चा होती. यावर आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, नाना पटोले यांच्या प्रतिक्रियेवर मी काय बोलणार. माझी वाचा गेलेली आहे. तसेच त्यांच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवारही आहेत का? हेही तपासावे लागेल.
“नाना पटोले आमचे सहकारी आहेत. काँग्रेस पक्षाचे ते ज्येष्ठ नेते असून त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भुषविलेले आहे. राजकारणामध्ये काहीही अशक्य नसते, एवढेच यानिमित्ताने सांगू शकते. २०१९ साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे कुणाला वाटले होते का? त्यानंतर अडीच वर्षांनी घटनाबाह्य, अर्ध-मुर्ध सरकार सत्तेवर येईल, असेही कुणाला वाटले नव्हते. त्यानंतर २०२४ साली देवेंद्र फडणवीस यांना इतके मोठे बहुमत मिळेल, असे कुणाला स्वप्नात तरी वाटले होते का?”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
राजकारणात सर्व काही शक्य आहे, असे सांगून संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या विधानाचा थेट विरोधही केला नाही. राजकारणातील सर्व शक्यतांचा विचार करून पुढची पाऊले टाकायची असतात, असे माननाऱ्यांमधील आम्ही आहोत. नाना पटोले यांनी कुणाला ऑफर दिली असेल आणि त्यांची ऑफर स्वीकारली गेली असेल तर आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात ज्याप्रकारे पडद्यामागे राजकारण सुरू आहे. जे रूसवे फुगवे आम्ही पाहतोय. आदळआपट उघडपणे दिसत आहे. ते पाहता नाना पटोले यांनी लवकर भांडे वाजवले. त्यांनी थोडे थांबायला हवे होते, असेही संजय राऊत म्हणाले.
जयंत पाटील यांचे उत्तम चालले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या काही विधानांमुळे ते पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. यावरून वेगवेगळ्या चर्चा समोर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच आपण शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचेही ते म्हणाले. यावरही संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जयंत पाटील यांचे त्यांच्या पक्षात उत्तम चालले आहे.
जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सर्वात महत्त्वाचे सहकारी आहेत. शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू नेते आहेत. जयंत पाटील यांच्यासंदर्भात कोणत्याही अफवा पसरवू नका, असेही संजय राऊत म्हणाले.
नाना पटोलेंच्या ऑफरमध्ये मुनगंटीवार तर नाहीत ना?
सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा अधूनमधून पुढे येते. त्यातच अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते आक्रमकपणे विषय मांडत आहेत. त्यामुळे विरोधकांची भूमिका सरकारमधीलच एक आमदार निभावत आहे का? असाही प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, “नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जी ऑफर दिली, त्यात सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे का? हे तपासले पाहिजे.”