विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे स्वागत करत असताना उबाठा गटावर टीका केली होती. “या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित करत प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले संजय राऊत?
घराणेशाहीचा अंत झाला, असे एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मग श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का? त्याला पद देताना माझा मुलगा आहे, त्याला पद द्या, असे सांगून पद घेतले होते. घराणेशाहीवर बोलण्याआधी तुम्ही श्रीकांत शिंदेवर बोला, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. “बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्याकडे घराणेशाही कधीच नव्हती. विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्या त्या कुटुंबातील लोक पुढे येतात. लोकांना ते स्वीकारायचे असेल तर ते स्वीकारतात नाहीतर त्यांना बाजूला करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात घराणेशाही नाही. त्यांच्या घरातील लोक जर बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेले तरच लोक त्यांना स्वीकारतील”, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे भाजपाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. ते महाराष्ट्राच्या मुळावर उठले आहेत. महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत, त्यांचे ते पुरस्कर्ते आहेत. शिवसेनेला इतिहासजमा करण्याची दिल्लीतील गुजराती टोळीचे मनसुबे आहेत, पण ते शक्य होणार नाही. ज्याप्रमाणे या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडले, त्याप्रमाणे महाराष्ट्र यांना गाडल्याशिवाय राहणार नाही.
हिटलरशाहीत घाणेरडे खोक्याचे राजकारण विधिसंमत झाल्याची आदित्य ठाकरे यांची जहरी टीका
राहुल नार्वेकर भाजपाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागले
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायाधिकरणाची (tribunal) जबाबदारी दिली होती. मात्र वकील असलेल्या राहुल नार्वेकर यांनी न्यायाची बाजू न मांडता शिंदे गटाची वकिली करण्याचे काम काल केले. त्यांचे निकालपत्राचे वाचन पाहताना एका गद्दार गटाची ते बाजू मांडत असल्याचे दिसले. त्यांनी उल्लेख केलेली २०१८ ची घटना वैगरे वैगरे सर्व खोटं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच सांगितले की, भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवड चुकीची आहे. शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवडही अवैध आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुरावे तपासून आपला निकाल दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना पायदळी तुडवले गेले . राहुल नार्वेकर हे काल निकाल देताना भाजपाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागले. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयात आमचा विजय होताना महाराष्ट्राला पाहता येईल, अशी आमची खात्री आहे.
आता मणिपूरच्या राम मंदिरातही जाऊ
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असून ते काळाराम मंदिरातही जाणार आहेत. यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही काळाराम मंदिरात जाण्याची योजना आखल्यानंतर भाजपाचे लोक पंतप्रधान मोदींना नाशिकमधील काळाराम मंदिरात आणत आहेत. आता शिवसेना मणिपूरमधील राम मंदिरात जाण्याचाही विचार करत आहे. मग पंतप्रधान मोदी मणिपूरलाही जाणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.