महाराष्ट्रातील प्रकल्प एकामागोमाग गुजरातमध्ये जात असल्याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प नुकताच गुजरातला गेला या विषयावर बोलताना ते म्हणाले, टेस्ला, सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्प, हिरे बाजार असे १७ प्रकल्प या सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेले आहेत. सगळे प्रकल्प जबरदस्तीने खेचून नेले, याला दरोडेखोरी म्हणतात. गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे. यासाठी दहशतवादाचा गुन्हा दाखल केला पाहीजे. हे मोदी भक्त, हिंदुत्ववादी राज्य सरकारला एक शब्दही बोलता येत नाही. यापेक्षा गुजरातला सोन्याने मढवा त्याची द्वारका करा, आमचे काही म्हणणे नाही. पण त्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या तोंडचा घास का हिरावता? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास, असा दावा संजय राऊत यांनी केला. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, एका राज्याचे नाही. पण आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुबळे, लाचार झाले आहेत. सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्याची नारायण राणे यांच्यात हिंमत नाही, असेही राऊत म्हणाले. मी २५ वर्ष शिवसेनेमध्ये होतो, असे ते म्हणतात ना. मग त्यांनी एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, असे ठणकावून सांगावे.
संपूर्ण देशात अमली पदार्थाचे रॅकेट सुरू
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नाव चोरले. त्यांनीही हे बोलून दाखवावे. अजित पवार यांनीही आपला बाणा दाखवून द्यावा. या राज्यातला एकही उद्योग, रोजगार बाहेर जाऊ देणार नाही”, असे सांगण्याची यांच्यात हिंमत आहे का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला. संपूर्ण देशात अमली पदार्थाचे रॅकेट सुरू आहे. त्याचे केंद्रस्थान गुजरातमध्ये आहे. गेल्या काही वर्षांत मोदींचे सरकार आल्यापासून साडे तीन लाख कोटींचे अमली पदार्थ गुजरातच्या मुंद्रा बंदरातच पकडले गेले आहे. यातील सर्वाधिक अमली पदार्थ महाराष्ट्रात येत आहेत.
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग चालले आहेत आणि गुजरातमधून महाराष्ट्रात अमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकारच रेव्ह पार्टीतून निर्माण झाले आहे. पैशांनी निर्माण केलेले हे सरकार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे, हे सरकारला दिसत नाही का? असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
आमदार, नगरसेवकांचे भाव वाढविले..
नव्या वर्षात राज्य सरकार जुनी ओझी घेऊन चालले आहे. मागच्या दीड वर्षात या सरकारने आमदार, पदाधिकाऱ्यांचे भाव वाढविले. पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कधी वाढविणार? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच होती, त्याचे काय झाले? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. या सर्व प्रश्नांवरचा आक्रोश खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांन आक्रोष मोर्चातून मांडला.
राम मंदिराचे मंगल कार्यालय केले
राम मंदिराचा सोहळा हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यात आम्ही बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. सध्या राम मंदिराचा सोहळा फक्त भाजपाचा झाला आहे. तो देशाचा व्हायला हवा. हा फक्त धार्मिक सोहळा नसून देशाचा सांस्कृतिक सोहळा आहे, मात्र भाजपाने त्याला राजकीय सोहळा करून टाकला. स्वतःच्या घरातील मुंज, लग्नाचे निमंत्रण देतात, तशा पदधतीने भाजपाचे लोक निमंत्रण देत आहेत. जणू काय राम मंदिराचे यांनी मंगल कार्यालय करून ठेवले आहे. प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. हा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. राम मंदिरासाठी असंख्य शिवसेनेने त्याग केलेला आहे. त्याला आम्हाला आता कोणतेही गालबोट लावायचे नाही. पण योग्यवेळी आम्ही बोलू.