MVA on Chhatrapati Shivaji Statue Collapse: सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त (४ डिसेंबर २०२३) उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकारण पेटले आहे. आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते गेल्यानंतर तिथे भाजपाचे खासदार नारायण राणे आणि भाजपाची नेतेमंडळी पोहोचली. यामुळे राजकोट किल्ल्यावर दोन तास तणाव निर्माण झाला होता. या घटनेवर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं यांचा उल्लेख केला.
तेव्हा कोश्यारींची टोपी का नाही उडाली?
मातोश्री येथे आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. तसेच राजकोट किल्ल्यावर घडलेला प्रसंग दुर्दैवी असून यामागे भाजपाचे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोपी तीनही नेत्यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले कारण अतिशय निर्लज्जपणाचे आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे समुद्रकिनारी असलेल्या राजभवनावर राहत होते. त्यांनीही महाराजांचा अपमान केला होता. पण समुद्रावरील जोरदार वाऱ्यामुळे माजी राज्यपाल कोश्यारींची टोपी उडाली, असे माझ्या तरी वाचनात कुठे आले नाही.
हे वाचा >> ‘शिवद्रोही सरकारविरोधात मविआ आंदोलन पुकारणार’; उद्धव ठाकरे म्हणाले, “आता १ सप्टेंबर रोजी…”
१ सप्टेंबर रोजी मविआचे आंदोलन
राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. “१ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष यात सहभागी असणार असून राज्यातील शिवप्रेमींनी यात सामील व्हावे”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मालवण येथे उभारलेल्या पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आता शालेय शिक्षण मंत्री वाईटातून काहीतरी चांगले होणार असे म्हणत आहेत. याचा अर्थ पुन्हा एकदा निविदा काढून मोठा भ्रष्टाचार केला जाणार आहे. जिथे तिथे पैसे खाण्याचा उद्योग सरकारकडून केला जात आहे.
हे ही वाचा >> Narayan Rane : “एकेकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी
भ्रष्टाचार टोकाला पोहोचला आहे – शरद पवार
पंतप्रधान मोदींनी ज्या पुतळ्याचे अनावरण केले, तोच पुतळा कोसळणे दुर्दैवी आहे. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेला पाठीशी घालण्यासाठी विविध विधाने केली जात आहेत. त्यावरून भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे हे दिसते. भ्रष्टाचाऱ्यांनी कुठे भूमिका घेऊ नये, याचेही तारतम्य सरकारला उरलेले नाही. लोकांमध्ये या सरकारविरोधात तीव्र भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करणार आहोत, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा >> BJP VS Mahavikas Aghadi : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे समर्थक भिडले
नौदलावर जबाबदारी टाकणे योग्य नाही
राज्य सरकारने नौदलावर जबाबादारी ढकलण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला आहे. आपले नौदल इतके पोकळ नाही. त्यांना समुद्रकिनारी वाहणाऱ्या वाऱ्याचा अंदाज असतो. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि कोकण जिंकायचे या ईर्षेने घाईघाईत तो कार्यक्रम मालवण येथे घेण्यात आला. तसेच शिल्पकाराबद्दल माहिती समोर आली आहे. नवख्या शिल्पकाराकडून ठराविक वेळात पुतळा करून घेण्याचा दबाव टाकला गेला. समुद्रकिनारी पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, याचा अभ्यास केला गेला नाही, अशीही भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.