Uddhav Thackeray on Maharashtra Band: बदलापूर लैंगिक अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदची माहिती देण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसत्ता दैनिकात छापून आलेल्या बातमीचा हवाला देत सरकार आणि संबंधित शिक्षण संस्थेवर जोरदार टीका केली. चिमुकल्या मुलीला झालेल्या जखमा सायकलवरून पडल्यामुळे झाल्या असतील असे मुख्याध्यापिकेने म्हटले, अशी बातमी लोकसत्ताने आज दिली आहे. “पालकांच्या तक्रारीकडे शाळेने अक्षम्य दुर्लक्ष केले, हे संतापजनक होते. वर्तमानपत्रात रोज अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही. पण आपल्या बहिणीचे रक्षण करणेही गरजेचे आहे”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उच्च न्यायालयाने सरकारला थोबडवले
“आमच्या बंदबाबत सरकार काहीही बोलत असले तरी मी जनतेच्या वतीने बोलत आहे. जनतेचे मत फक्त निवडणुकीच्या काळातच व्यक्त केले पाहीजे, असे नाही. अधेमधेही जनता आपले मत व्यक्त करू शकते. बदलापूरचे उस्फुर्त आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते, असा आरोप सरकारने केला. मात्र उच्च न्यायालयाने उस्फुर्तपणे या प्रकरणाची दखल घेतली आहे. मग न्यायालयही राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, असा आरोप सरकार करणार का? न्यायालयाने सरकारला काल थोबडवले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.
हे वाचा >> …‘या’ जखमा सायकल चालविल्याने झाल्या असतील! बदलापुरातील शाळा मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “बदलापूरमधील आंदोलकांचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत, ही आमची मागणी असणार आहे. उद्याच्या बंदनंतर आम्ही ही मागणी करणार आहोत. विकृती आपल्या दारापर्यंत येऊ नये, यासाठी आपल्याला बंदमध्ये सर्वांनी उतरले पाहीजे.” तसेच जे लोक बंद विरोधात न्यायालयात गेले आहेत. त्यांना आपल्या माता-भगिनींबद्दल चिंता नसेल. म्हणून ते बंदच्या विरोधात गेले असावेत. नराधमांचे पाठिराखे उद्या उघड होतील. त्यांच्याबद्दल समाज निर्णय घेईल, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा >> महाराष्ट्र बंद दरम्यान रेल्वे, बस सेवेवर काय परिणाम होणार? उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्या…”
महाराष्ट्र बंद हा ‘विकृती विरुद्ध संस्कृती’
बंदबद्दल माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी आहे. आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृतीविरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यश – अपयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. आपल्या माता-भगिनींची सर्वांना चिंता आहे, हे सरकारला दाखवून दिले पाहीजे.
उद्याचा बंद फक्त महाविकास आघाडीच नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने पुकारला गेला आहे. जात, धर्म, पंथ, भाषा या सीमा ओलांडून सर्वांनी सहभागी व्हावे. कडकडीत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे २४ ऑगस्टचा बंद दुपारी २ वाजेपर्यंतच पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच बंद दरम्यान दुकाने, रेल्वे, बस सेवा बंद ठेवायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.