Sanjay Raut on NCP Sharad Pawar faction: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. अर्थात या भेटी वाढदिवसानिमित्त असल्या तरी शरद पवार गटाचे काही खासदार अजित पवार यांच्यासह सत्तेत बसण्यास इच्छुक असल्याची चर्चा असल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना याबाबत आज प्रश्न विचारला असता त्यांनी या चर्चेवर स्पष्टपणे उत्तर दिले.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांना अद्याप केंद्रात मंत्रिपद मिळालेले नाही. केंद्रात मंत्रिपद हवे असल्यास सहा खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. माझ्या माहितीप्रमाणे, शरद पवार गटाचे पाच खासदार फोडून घेऊन या, असे प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेले आहे. तेव्हा तुमचा सहा खासदारांचा कोटा पूर्ण होईल आणि तुम्हाला मंत्रिपद देण्यात येईल. यासाठी शरद पवार यांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. जे कुणी फुटणार असतील त्या फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे.”
हे वाचा >> नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
शरद पवारांशी बेईमानी म्हणजे राज्याशी बेईमानी
शरद पवार गटाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला असे वाटत नाही. काल वाढदिवसानिमित्त शरद पवारांचे सर्व खासदार दिल्लीत उपस्थित होते. काही लोकांनी अद्याप लाज शिल्लक ठेवल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसले. बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार एक मोठे नेते आहेत. जर कुणी त्यांच्याशी बेईमानी केली तर ती महाराष्ट्राशी बेईमानी केल्यासारखे होईल.
गौतम अदाणी महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू पाहत आहेत
उद्योगपती गौतम अदाणी यांच्या घरी अलीकडे राजकीय बैठका वाढल्या आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य ठरविण्याचा प्रयत्न अदाणी करत आहेत. ज्यांनी मुंबईचे विमानतळ ताब्यात घेतले, धारावीची हजारो एकर जमीन गिळली, अनेक जकात नाके ताब्यात घेतले. हे गौतम अदाणी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरविणार आहेत. गौतम अदाणी म्हणजे आचार्य विनोबा भावे, दादाजी धर्माधिकारी, जमनालाल बजाज किंवा यशवंतराव चव्हाण आहेत का? राजकारणांच्या गटातटात मध्यस्थी करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा >> Sunanda Pawar: “मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद…”, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुनंदा पवार यांचं मोठं विधान
जे मुंडी खाली घालून जे नेते अदाणींच्या घरी बसत आहेत, त्यांन स्वतःला मराठी म्हणवून घेताना लाज वाटली पाहीजे, असेही ते म्हणाले.