रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात झालेल्या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सरशी झाली असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला झटका बसला आहे.
तालुक्यातील फणसोप, पोमेंडी आणि शिरगाव या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाचे सरपंच थेट निवडणुकीत विजयी झाले आहेत. शिरगावमध्ये शिंदे गटाचे बहुसंख्य सदस्य विजयी झाले. पण सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे या निमित्ताने ग्रामीण भागातील मूळ शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिल्याचेही अधोरेखित झाले आहे.
निवडणूक झालेल्या ३ ग्रामपंचायतींपैकी शिरगावमध्ये १७ पैकी १४ जागांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या. काही ठिकाणी उमेदवारांनी निसटते विजय मिळवले.
शिरगावमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून फरिदा काझी व अल्ताफ संगमेश्वरी हे विजयी झाले. सर्वसाधारण स्त्री गटातून रहिमत काझी व सना चिकटे, सर्वसाधारण गटातून शकिल मोडक, सचिन सनगरे , मयूर सांडीम, उझेर काझी, सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शाहीन मुजावर, कांचन गोताड, अंकिता सनगरे, खुशबू काझी, स्नेहा भरणकर, जान्हवी कदम, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गटातून मिथिला शिंदे, निरजा शेटय़े हे उमेदवार विजयी झाले.
सरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या फरिदा काझी २ हजार ६७ मते मिळवून विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार श्रध्दा मोरे या १ हजार ९०२ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर, तर शिंदे गटाच्या साक्षी कुमठेकर तिसऱ्या क्रमांकावर (१७६३ मते) फेकल्या गेल्या.
फणसोप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उध्दव ठाकरे गटाच्या राधिका साळवी आणि शिंदे गटाच्या अमृता शेलार यांच्यात झालेल्या थेठ लढतीत राधिका साळवी तब्बल पावणेचारशे मतांनी विजयी झाल्या. फणसोपमध्ये राकेश साळवी, अक्षया पराग साळवी, रितेश रवींद्र साळवी, रेणुका राजेंद्र आग्रे, साक्षी चौगुले हे ५ उमेदवार विजयी झाले. यातील राकेश साळवी वगळता उर्वरित चारही विजयी उमेदवार उध्दव ठाकरे गटाचे आहेत.
पोमेंडीमध्येही महाविकास आघाडीच्या ममता जोशी यांनी शिंदे गटाच्या विधी बारगोडे यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची युती न झाल्याने फटका बसला. कारण भाजपच्या राजश्री कांबळे यांनी सहाशेहून अधिक मते घेतली. तर सदस्यपदी गाव पॅनलचे दिगंबर मयेकर, सायली बाणे, राजेंद्र कदम, विशाल भारती, प्रांजल खानविलकर, भाजपच्या विजया कांबळे, महाविकास आघाडीच्या नलिनी कांबळे, राजेंद्र कळंबटे, रेश्मा कांबळे आणि प्राजक्ता जोशी हे उमेदवार विजयी झाले. शिंदे गटाने गाव पॅनलला पाठिंबा दिला होता.
रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी चरवेली ग्रामपंचायत बिनविरोध झाली. अन्य तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रविवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी पार पडली.
शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात होते, तर सदस्य पदाच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवारांनी निवडणूक लढवली.
फणसोप ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी २ उमेदवार रिंगणात होते, तर सदस्यपदाच्या ११ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ३ उमेदवारांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते, सदस्यपदाच्या ११ जागांसाठी ३१ उमेदवारांनी निवडणूक लढवली.