एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपाशी हातमिळवणी केली. शिवसेनेतील ४० आमदार आणि काही खासदारांना बरोबर घेऊन त्यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा केला. शिवसेना पक्ष म्हणून भाजपाशी युती करून सरकार स्थापन केलं. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले, तसेच विधिमंडळात घडलेल्या अनेक घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. परंतु आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. या सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत. सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घायला सांगितलं होतं. या आमदारांविरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा >> अजित पवारांच्या बंडामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होणार? बाळासाहेब थोरात म्हणाले…

सुनील प्रभू यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी दिलेल्या निकालात सांगितलं होतं की, आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय वाजवी वेळेत (Reasonable Period) घ्यावा. परंतु यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणतंही पाऊल उचलेलं नाही. आम्ही (ठाकरे गट) विधानसभा अध्यक्षांना आतापर्यंत तीन वेळा निवेदन दिलं आहे, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena uddhav thackeray group appeal to supreme court for speedy disqualification of eknath shinde and rebel mlas asc