राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला. “राम मंदिरातील भगवान रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व रावण रामाचा मुखवटा घालून फिरत होते”, अशी टीका त्यांनी केली. तसंच, “संजय राऊतांनी रामाने वालीचा वध का केला ते सांगितलं. आपल्यालाही वालीचा वध करावा लागेल कारण त्यांनी आपली शिवसेना पळवली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या हक्काची शिवसेना पळवणारे वाली आणि त्यांचे कुणीही वाली असतील त्यांचा आम्ही राजकीय वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बाळासाहेब भवन येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्रतेने अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ठाकरेंना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच म्हणेन. अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार विकले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. सत्तेच्या खुर्चीपायी, मोहापायी काँग्रेसला मांडीवर घेतलं, काँग्रेसला डोक्यावर घेतलं. महाराष्ट्रातील करोडो जनतेबरोबर विश्वासघात केला. बेईमानी केली. निवडणुका एकाबरोबर, संसार एकाबरोबर आणि हनिमून एकाबरोबर असे धंदे करणाऱ्यांना बोलणं शोभत नाही. त्यांच्या अहंकारामुळे हे राज्य मागे गेलं, आम्ही राज्याच्या विकासासाठी सरकार पलटवून टाकलं. त्यांनी बोलताना आत्मपरिक्षण करावं. त्यांच्यावर ही वेळ का आली याचं आत्मचिंतन करावं.”
हेही वाचा >> “आपली शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध..”, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये
“एका खुर्चीच्या मोहापायी त्यांनी पूर्णपणे वैचारिक व्यभिचार केला. विचार सोडले. त्याचे काय फळ मिळालं हे आपल्याला माहित आहे. शिवसेना म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करतोय. हिंदुत्त्वाची भूमिका पुढे नेतोय. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं आहे हा निर्णय दिलेला आहे. यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही”, असंही शिंदे म्हणाले.
मुखवटा घालून फिरणाऱ्यांचा मुखवटा मला फाडायचा आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “ज्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवर आणि रामाच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्यांना बोलण्याचा अधिकर नाही.
अहंकारामुळे राज्य खड्ड्यात टाकलं
उद्धव ठाकरेंना रामाची आणि पंतप्रधांना रावणाची उपमा संजय राऊतांनी आज दिली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “राम आणि रावण कोण आहे हे संपूर्ण जनतेला माहित आहे. रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं हेही माहित आहे. अहंकारी रावणामुळे लंकेचं काय झालं हे पाहिलं. त्यामुळे अंहकारी राज्यकर्ते असता कामा नये. राज्याचं हित कशात आहे हे लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. अंहकार आणि इगोमुळे राज्याला खड्ड्यात टाकण्याचं काम ज्यांनी केलं त्यामुळे लोकांना माहितेय की रावणाची आणि रामाची वृत्ती कोणाची आहे.”