उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ातील शिवसेनेच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी कराड येथील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तुरंबे येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यामध्ये कराड येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या होणाऱ्या आंदोलनापूर्वी शिवसेनेने आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यामध्ये आंदोलनाचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सध्या जिल्ह्य़ामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी कराड येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सातारा जिल्ह्य़ातील तीन, सांगलीतील दोन व कोल्हापूर जिल्ह्य़ातील तीन जिल्हाप्रमुख तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी सहभागी होणार आहेत. शिवाजी पुतळा येथून वाजत गाजत उसाच्या कांडय़ासह हा मोर्चा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या पाटण कॉलनीत जाणार आहे. ऊस दर प्रश्नामध्ये मुख्यमंत्र्यांनी समन्वय घडवून आणावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली जाणार असल्याचे देवणे यांनी सांगितले. मोर्चाला परवानगी दिली नाही तरी तो निघणारच आहे. आंदोलन दडपून काढण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकविला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.     
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या प्रश्नांसाठी उद्या बुधवारी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा उल्लेख करून देवणे म्हणाले, उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांची बैठक आयोजित केली असली तरी त्याचे आंदोलकांना अद्याप निमंत्रण नाही. ते मिळाल्यास शिवसेनेचा प्रतिनिधी त्यामध्ये सहभागी होऊन उसाला ३५०० रुपये दर देणे कसे रास्त आहे, याबाबतची भूमिका स्पष्ट करेल.
१५० शिवसैनिकांना अटक
उसाला ३५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यां १५० शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली व सायंकाळी त्यांची सुटका केली. आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, महिला संघटक सुषमा चव्हाण, तालुका महिला संघटक शोभा पाटणकर, युवा जिल्हा अधिकारी संदीप पाटील, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, चंद्रकांत भोसले, सुधीर राणे आदी सहभागी झाले होते.

Story img Loader