कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय आजवर सुरु असल्याची माहिती मंगळवारी पुढे आली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज याबाबत पाठपुरावा करून या विभागाची परवानगी मिळवली आहे. यामुळे शिवाजी पुलाचा लटकत असलेल्या वाद संपुष्टात येण्याची चिन्हे असून पावसाळ्यापूर्वी पूल वापरात येण्याची शक्यता आहे.
येथील पंचगंगा नदीवरील जुना पूल वाईट अवस्थेत आहे. यामुळे नवा पर्यायी शिवाजी पूल बांधण्याचे नियोजन आहे. आधी अनेक वर्षे पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय काम सुरु होते. नंतर परवाना मिळाला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यावर बांधकाम सुरु झाले. गेल्या आठवड्यात मुंबई येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आमच्या परवानगी शिवाय काम सुरु करता येणार नाही, काम सुरु केल्याने कायदेशीर कारवाई का करू नये, अशी नोटीस जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली होती. यावर निर्णय घेण्यासाठी बैठकांवर बैठका सुरु झाल्या होत्या.
या प्रश्नात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लक्ष घातले. केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिली नाही, असे लक्षात आल्याने त्यांनी काल दिल्ली येथे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालक उषा शर्मा यांच्याशी चर्चा करून विषयाचे गांभीर्य समजावून दिले. शर्मा यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकारी नंबिराजन यांना सकारात्मक सहकार्य करण्याची सूचना केली.
आज संभाजीराजे यांनी मुंबई येथील भारतीय पुरातत्त्व विभाग प्रादेशिक संचालक एम. नंबिराजन, पुरातत्त्व अधीक्षक बिपीनचंद्र नेगी यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून पुलाच्या १०० मीटर अंतरावरील जागा पुरातत्व विभागाकडे हस्तांतर करण्यासाबाबतचे नवे पत्र सादर केले. त्याआधारे आज मुंबईतील कार्यालयाने ४ क्रमांकांच्या फॉर्मद्वारे पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. या पत्रामुळे पुलाच्या कामाला अधिकृतता येण्याबरोबरच गतीही येण्याची चिन्हे आहेत.