छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून निर्माण झालेला वाद आता शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत येऊन पोहचला आहे. रायगड किल्ल्यावर दोन वेळा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाऊ लागला आहे. या निमित्ताने शिवप्रेमींमध्ये दोन गट तयार झाले आहेत. तारीख आणि तिथीच्या घोळात मात्र उत्सवाला वादाची किनार निर्माण होते आहे.
मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९३२ ला रायगडावर सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि हिंदवी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तमाम मराठी समाजासाठी ही महत्त्वाची घटना होती. महाराजांच्या कर्तृत्वाला राजमान्यता प्राप्त झाली. त्यामुळे जवळपास साडेतीनशे वर्षांनंतरही या घटनेचे महत्त्व कमी झालेले नाही. मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारा हा शिवराज्याभिषेक उत्सव रायगडावर दरवर्षी साजरा केला जावा, म्हणून २० वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक सेवा समिती आणि महाडच्या कोकण कडा मित्रमंडळाने पुढाकार घेतला होता. याच पुढाकारातून गेली दोन दशके तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर शिवराज्याभिषेक हा उत्सव साजरा करत होती.
मात्र पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानचे संभाजीराजे जेव्हा या सोहळ्यासाठी रायगडावर आले होते. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. आणि उत्सवात पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी त्यांनी हा उत्सव तारखेनुसार साजरा करण्याची घोषणा केली. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती स्थापन केली. छत्रपतींच्या या भूमिकेनंतर शिवराज्याभिषेक समितीत दोन गट पडले. तेव्हापासून शिवराज्याभिषेक सोहळा दोनदा साजरा होऊ लागला आहे. महाराजांच्या या उत्सवाला आता वादाची किनार निर्माण झाली.  
महाराजांचा मेघडंबरीत जबरदस्तीने बसवण्यात आलेला पुतळा असो अथवा वाघ्या कुत्र्याची समाधी तोडण्याची घटना असो, शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे इतर वादही निर्माण होत गेले. या उत्सवाला गालबोटही लागत गेले. या निमित्ताने कोल्हापूर, सांगली, पुण्याचा एक गट तर रायगड, डोंबिवली, कल्याण, मुंबई आणि साताऱ्याचा दुसरा गट तयार झाला. उत्सवाकडे लक्ष वेधण्यासाठी वाद निर्माण होत गेले. पूर्वी मोकळ्या वातावरणात उत्साहात साजरा होणारा हा उत्सव आता पोलीस बंदोबस्तात साजरा केला जाऊ लागला.
संभाजी महाराजांनी हा उत्सव लोकोत्सव व्हावा आणि जगभरात एकाच दिवशी म्हणजे सहा जूनला साजरा केला जावा अशी मागणी केली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी तारीख पाहून स्वत:चा राज्याभिषेक केला नव्हता, पंचांगानुसार तिथी पाहून हा उत्सव साजरा केला होता, अशी भूमिका कोकण कडा मित्रमंडळाने घेतली आहे. गेली वीस वर्षे तिथीनुसार साजरा होणारा उत्सव आम्ही बंद का करावा, असा सवाल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत झाले नसतील एवढे वाद आता त्यांच्या पश्चात निर्माण केले जात आहेत. महाराजांवर अपार प्रेम आणि श्रद्धा असणारे शिवप्रेमी या निमित्ताने एकमेकांसमोर येत आहेत. त्यामुळे तारीख, तिथी आणि पुतळ्यांचे वाद दूर ठेवून शिवप्रेमींनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा आणि रायगडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा