रायगडावर ३४०वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशे, लेझीम, पालख्या आणि पोवाडय़ांच्या तालावर शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून चार हजार शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १८३२ ला सकाळी सहा वाजता रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या दिवशी ६ जून ही तारीख होती. आज या घटनेला ३४० वर्षे पूर्ण झाली. याचेच औचित्य साधुन दुर्गराज रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती संभाजी राजे भोसले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, जिल्हाधिकारी एच. के. जावळे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण किल्याला झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते, राज्यातील विविध भागांतून मराठमोळ्या वेशात शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. ढोल, ताशे, लेझीम पथके, पोवाडय़ांच्या गजरात सोहळा पार पडला. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्णमुद्रा अभिषेक करण्यात आला.
राज्यातील गड किल्ल्यांच्या दुरवस्थेबद्दल या वेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यस्थानमधील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठा निधी दिला जातो. वेरुळच्या लेण्यांच्या संवर्धनासाठी जपान सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळते मात्र शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या गडकिल्ल्यांना मात्र निधी उपलब्ध होत नसल्याची खंत या वेळी संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केली. राज्यसरकारला जर या किल्ल्यांचे संवर्धन करता येत नसेल तर ही जबाबदारी शिवभक्त पार पाडतील, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जरूर बांधा मात्र त्याआधी या गड-किल्ल्यांचे संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यव्यापी जनजागृती दौरा करत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
गडकिल्ल्यांच्या बाबतीत राज्यसरकार असंवेदनशील असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराजांच्या नावाने राज्यकारभार करणाऱ्या राज्यसरकारला गडकिल्ल्यांचे संवर्धन करता येत नसेल तर या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम येत्या काळात आम्हाला करावे लागेल, असे ते म्हणाले. राज्यकर्त्यांनी शिवचारित्र्य आत्मसात करण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर जगदीश्वर मंदिरापर्यंत महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता झाली.
रायगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
रायगडावर ३४०वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशे, लेझीम, पालख्या आणि पोवाडय़ांच्या तालावर शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून चार हजार शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १८३२ ला सकाळी सहा वाजता रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या दिवशी ६ जून ही तारीख होती.
आणखी वाचा
First published on: 07-06-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji coronation ceremony enthusiastically celebrated at raigad fort