वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागतली होती, ते ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी केलं. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रसह देशभरातील राजकीय नेत्यांकडून निषेध केला.
हे प्रकरण ताजं असताना आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्तविधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोकं माफीनामा लिहायचे असं विधान त्रिवेदी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा- “कोश्यारी नावाचं पार्सल…” राज्यपालांनी छत्रपतींबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा हा व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजपा प्रवक्ता वेडाच असू शकतो.”
सुधांशु त्रिवेदी नेमंक काय म्हणाले?
राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.