Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sambhaji Chhatrapati Remarks : आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाचं (४ डिसेंब २०२३) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र हा पुतळा कोसळला असून राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून या कार्यक्रमावर व स्मारकाच्या कामावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. आता पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष यावरून सरकारवर टीका करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज (कोल्हापूर संस्थान) व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. तसेच संभाजीराजे म्हणाले, “हा पुतळा खूप घाईगडबडीत उभा केला होता. तसेच हा पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून बनवला नव्हता. त्यामुळे आम्ही हा पुतळा बदलण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं”. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. या पत्राचा फोटो देखील संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.
आता कोणत्या अधिकाराने महाराजांच्या किल्ल्यांवर बोलणार? संभाजीराजेंचा प्रश्न
संभाजीराजे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, “पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई-गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे”.
“राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला!” शरद पवार गटाची टीका
या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षानेही राज्य सरकार व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रवादीने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका! नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला!