Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पुतळ्याचा दर्जा निकृष्ट होता, अशा प्रकारचा पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) सरकारने उभा केलाच कसा काय? असा प्रश्न विचारला जातो आहे. अशात आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

काय घडली घटना?

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पुतळ्याची ( Shivaji Maharaj Statue ) उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले असले तरी, विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचे खापर फोडले आहे. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली तर, रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका केली. आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “शिवरायांचा पुतळा कोसळणं ही सर्व भारतीयांसाठी…”, अखिलेश यादवांचा संताप; केली मोठी मागणी

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत. दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकाने सुंदर असा अफझल खान वधाचा देखावा सादर केला. एवढे थर लावून तो प्रसंग आम्ही पाहिला. आमच्या अंगावरही रोमांच उभे राहिले. अफझल खानरुपी कितीही शक्ती स्वराज्यावर चालून आल्या तरीही त्यांचा कोथळा लोकशाही पद्धतीने आम्ही बाहेर काढू.”

आठ महिन्यांपूर्वी या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. (PC : @YuvrajSambhaji/X)

या गोष्टीचं राजकारण करणं दुर्दैवी

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. सगळ्यांनाच वेदना झाल्या आहेत. यावर कोणीही राजकारण करु नये. महाराष्ट्र सरकारने पुतळा उभारला नव्हता तर नौदलाने उभारला होता. ज्यांना हे काम देण्यात आलं त्यांना कदाचित इतक्या वेगाने तिथे वारे वाहतात याचं आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी आम्ही नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, यावर राजकारण करणं हा खुजेपणा आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.