दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने शासनाची परवानगी घेतली नसल्याने या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम दुसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २० मार्च रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार होते, मात्र तो कार्यक्रम रद्द झाला. आता शुक्रवारी २२ मार्चला ते या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.
जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, पालिकेकडून पुतळ्याच्या उभारणीला परवानगी मागणारा अर्ज आला आहे. जिल्हा समितीच्या बैठकीत या विषयी निर्णय होईल. हा अहवाल शासनाला पाठविल्यानंतर शासन या विषयी निर्णय घेऊन पुन्हा तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर पुतळा उभारणीला परवानगी दिली जाईल. या विषयी २२ मार्च रोजी बैठक आयोजित केली आहे. मात्र, पुतळा उभारणीला अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
पोलीस उपायुक्त पराग मणेरे म्हणाले, पालिकेने पुतळ्यासाठी काही परवानग्या घेतल्या आहेत. जिल्हास्तरावरील समितीचा निर्णय आणि त्यानंतर मिळणारी शासनाची परवानगी अत्यावश्यक असल्याने पुतळा उभारणीला अधिकृत परवानगी मिळालेली नाही.
पुतळा उभारणीसाठी शासनाच्या गृह व कला संचालनालयाची परवानगी लागते. एवढे माहीत असूनही पालिका प्रशासनाने शासनाची परवानगी मिळविण्यात चालढकल का केली. आता जबाबदारी प्रशासनाची आहे, असा प्रश्न शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महापौर वैजयंती गुजर यांना गेल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तोंड बदलणे व अश्वारूढ पुतळा उभारणे या विषयी ठोस विकासकामे करता आली नाहीत.
आता महापौरपदावरून पायउतार होताना काही तरी करून दाखविले म्हणून महापौरांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा घाट शिवसेनेकडून घालण्यात आला आहे, असे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा