मुंबई, पुण्याबाहेरील संस्थेचे असूनही सदैव चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा १०० वा प्रयोग सोमवारी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यानिमित्त नाटक संपल्यानंतर कलामंदिरातच विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव म्हणून ऐतिहासिक महत्व असलेल्या जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावातील तेरा युवकांनी सुरू केलेल्या रंगभूमी चळवळरूपी वेलीला आलेले अनोखे फूल म्हणजेच ‘शिवाजी अंडरग्राऊंड..’ हे नाटक होय. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या दिल्लीतील संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भारडूम’ या जागतिक रंगभूमीवरील दर्जेदार नाटके सादर होणाऱ्या महोत्सवासाठी या नाटकाची निवड करण्यात आली आहे. राजकुमार तांगडे लिखित आणि नंदू माधव निर्मित व दिग्दर्शक या नाटकाकडे मराठी रंगभूमीवरील सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक घुसळण करणारे नाटक म्हणून पाहिले गेले आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागात नाटकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. युवावर्गानेही या नाटकाच्या विषयाचे स्वागत केले. चळवळीला सांस्कृतिक बळ देणारे म्हणूनही या नाटकाची चर्चा झाली. नाटकाचा विषय कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चर्चेत राहिल्याने त्याचे प्रयोगही झपाटय़ाने पार पडत गेले. त्यामुळेच १०० व्या प्रयोगाचा टप्पाही अल्पावधीत येऊन पोहोचला. परंपरा तोडणारे नाटक असल्याने या नाटकाचा १०० वा प्रयोगही मुंबई, पुण्याबाहेर करण्याचे जाणीवपूर्वक ठरविण्यात आल्याची माहिती निर्माता व दिग्दर्शक नंदू माधव यांनी दिली.