सांगली : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. आ. सुहास बाबर यांनी आजच याबाबत घोषणा करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मंत्री पाटील यांनी उपकेंद्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरिता १४१ कोटींचा निधीही मंजूर केला.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे अशी आग्रही मागणी २०१३ पासून करण्यात येत आहे. यासाठी खानापूरमध्ये गायरानामधील जागाही उपलब्ध करण्याची तयारी दर्शवण्यात आली असून संदर्भात आ. बाबर यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. दुष्काळी भागात सध्या पाणी आले असले तरी शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाचे उपकेंद्र होणे गरजेचे आहे. याबाबत लोकभावनाही तीव्र असून शासनाने या भावनेचा विचार करून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आ. बाबर यांनी केली.
या मागणीला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करत असल्याची घोषणा करत असतानाच १४१ कोटींचा निधीही मंजूर करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे आ. बाबर आणि आ. गोपीचंद पडळकर यांनी संयुक्तपणे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने विद्यापीठ उपकेंद्र मंजूर करून दुष्काळी जनतेच्या विकासाची संधी दिली असल्याचे दोघांनी सांगितले.
या उपकेंद्रामुळे सांगलीसह सातारा जिल्ह्यातील खटाव, माण या तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या निर्णयाचे विट्यात आ. बाबर समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजीही केली.