काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं आहे. तसेच कायद्याने ३० टक्के आरक्षण मिळणार नसेल, तर आम्ही मुली राजकारणात सहभागी होऊन ते मिळवू, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. त्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो यात्रेत’ सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी गुरुवारी (१७ नोव्हेंबर) एपीबी माझाशी बोलताना हे वक्तव्य केलं.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून नेत्यांची मुलंच राजकारणात येत आहेत. मात्र, आता आमच्या पीढित नेत्यांच्या मुलीही राजकारणात येत आहेत. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं आम्हाला वाटतं. कारण कुठे ना कुठे आमच्यातील आत्मविश्वास वाढतो आहे.”
“आम्ही मुली राजकारणात येऊन ३० टक्के आरक्षण घेणार”
“काँग्रेस पक्ष महिला आरक्षणासाठी आधीपासून लढत आहे. लोकसभा आणि विधानसभेत किमान ३० टक्के आरक्षणाची आमची मागणी आहे. ते आरक्षण कायद्याने मिळणार नसेल तर मग आम्ही मुली राजकारणात येऊन या मार्गाने घेण्याचं आम्हा मुलींचं नियोजन सुरू आहे. त्यात यश आलं तर ते सर्व महिलांसाठी चांगलं ठरेल,” असं मत शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
“भारत जोडो यात्रेत मुलींसाठी सहजपणाचं वातावरण”
शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या, “महिलांचा प्रतिसाद खूप वाढला आहे. हे बघून खूप आनंद होत आहे. माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली आहेत. त्यांनी जबाबदाऱ्याही घेतल्या आहेत. भारत जोडो यात्रेत आम्ही रात्री एकत्र बसलो की आमच्या चर्चा होतात. भारत जोडो यात्रेत जसं सहजपणाचं वातावरण आहे तसं असलं की घरचेही पाठवायला मागेपुढे पाहत नाही. हे वातावरण काँग्रेस पक्ष देतो आहे आणि याचा मला अभिमान आहे.”
“भारत जोडो यात्रेत समानतेची अनुभूती”
“राजकारण म्हटलं की फक्त पुरुष आणि मुलं असं चित्र दिसायचं. त्यामुळे आधी मनात विचार यायचा की कार्यक्रमांना कसं जायचं, कोणाशी किती बोलायचं अशा अडचणी यायच्या. आता सहजपणा आला आहे. जितकी मुलं आहेत, तितक्याच मुली आहेत. त्यामुळे समानतेची अनुभूती होत आहे,” असंही शिवानी वडेट्टीवार यांनी नमूद केलं.