काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवर काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. “सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा”, असं विधान शिवानी वडेट्टीवार यांनी एका सभेत बोलताना केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यासंदर्भात वाद निर्माण झालेला असताना शिवानी यांचे वडील विजय वडेट्टीवार यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रविवारी अर्थात १६ एप्रिल रोजी नागपूरमध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सभेच्या आधीच सावरकरांबाबत काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या या विधानामुळे ठाकरे गटाकडून त्यावर विरोधी भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील सभेत या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार?
शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं आहे. “हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाही. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी वडेट्टीवार बोलताना या व्हिडीओत दिसत आहेत.
दरम्यान, यावर विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना “हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही”, असं म्हटलं आहे.”मी शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोललीस. ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ ती सांगत होती. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
मविआत तणाव निर्माण होणार?
“मविआत तणाव निर्माण होण्यासारखी टीका केलेली नाही. एका पुस्तकाचा दाखला घेऊन ती बोलली असेल, तर त्याचा खुलासा ती करेल. पुस्तकात एखादा शब्द लिहिताना शब्दांचा अर्थ बदलू शकतो. हा विषय काही फार गंभीर आहे असं मला वाटत नाही”, असं वडेट्टीवार म्हणाले.
“मी तिला याचा संदर्भ विचारला, तर ती म्हणाली वीर सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकातून मी ते काढलं आहे. अशा बाबतीत प्रत्येकानंच माफी मागायची असेल, तर आधी राज्यपालांनी माफी मागायला हवी होती. अनेकांनी माफी मागायला हवी होती. वैचारिक चर्चा व्हायला पाहिजेत. तुम्ही या, समोरासमोर चर्चा करा. ती स्वत: वकील आहे. तिनं पुस्तकातून तो संदर्भ काढला असेल, तर त्यावर ती स्वत: बोलेल”, असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.