शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी गुरुवारी सकाळपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी महाआरती, पूजा, अभिषेक करत त्यांना दीर्घायू लाभो, असे साकडे घातले. नाशिकमध्ये दुपारनंतर प्रमुख बाजारपेठांत बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली. पोलिसांनी शहर व परिसरातील बंदोबस्तात वाढ करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली.
बुधवारी रात्रीपासून शिवसेनाप्रमुखांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती वाहिन्यांवरून प्रसारित होऊ लागल्यावर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. काही प्रमुख नेत्यांनी भल्या पहाटेच मुंबईकडे प्रयाण केले. बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर नाशिक शहरासह, नाशिकरोड, मनमाड, धुळे जिल्ह्यांत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी महाआरती करून साकडे घातले. नाशिकरोड येथील दुर्गा देवीच्या मंदिरात आ. बबन घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक प्रार्थना करण्यात आली. प्रत्येक शिवसैनिकांच्या चेहेऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. ज्येष्ठ शिवसैनिक दिवसभर टीव्हीसमोर ठाण मांडून प्रार्थनेत गुंतले होते. मनमाड शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील एकवीरा देवीच्या मंदिरात आ. शरद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, शहरात दुपारनंतर पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. दिवाळीच्या सुट्टीमुळे फुललेल्या बाजारपेठांमधील गर्दी कमी झाली. शिवसेनेच्या शालीमार कार्यालयातही वेगळे चित्र नव्हते. कोणी पदाधिकारी नसले तरी शिवसैनिकांच्या नजरा वाहिन्यांवरील बातम्यांवर खिळल्या होत्या.