खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहराच्या विकासाचा कोणताही विचार नाही. मागील पाच वर्षे सत्तेत असणारे त्यांचे पदाधिकारी व नगरसेवक प्रशासक आला की गायब झाले आहेत. पालिकेच्या कामकाजात अजूनही अडवा आडवी सुरु आहे. निवडणुका आल्या की यांची नौटंकी सुरु होईल. किती चांगला विकास केला ते सांगतील. मात्र, उदयनराजेंकडे सातारा शहर विकास करण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याने त्यांच्या विकास आघाडीने पालिकेतून निवृत्ती घ्यावी, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज ( १६ नोव्हेंबर ) जिल्हाधिकारी कार्यालयात पालिका कामांबाबत निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा शहरासह हद्दवाढ झालेल्या भागातील स्वच्छतेच्या विषयावरुन शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला खडे बोल सुनावले.
हेही वाचा : “प्रतापगडावर ‘शिवप्रताप स्मारक’ उभारण्याचा निर्णय कौतुकास्पद, पण…”, संभाजीराजेंनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “मागील पाच वर्षे सातारा विकास आघाडी सत्तेत होती. आता पालिकेवर प्रशासक आल्यानंतर त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक कुठे गायब झाले. प्रशासक आला की त्यांची सातारा शहराच्या प्रति असलेली जबाबदारी संपली का? पालिकेत गेल्या पाच वर्षात कोणी किती बिले काढली. कमिशनमधून किती मलिदा लाटला हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांचे नेते निवडणूक लागली की नौटंकी करत मते मागायला येणार आहेत. त्यांची नाटकं, नौटंकी, पप्पी घेणे, मिठ्या मारणे सुरु होणार आहे. त्यावेळी तुम्हाला मतांसाठी सातारकर आठवतात.”
हेही वाचा : आंबडेकर आणि CM शिंदेंच्या भेटीवरून सुषमा अंधारेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाल्या, “दबावाचे…”
“राज्य सरकारच्या योजनेतील कामाचे मर्जीतल्या ठेकेदारासाठी अडवले. आता देसाईंना काम मिळाले असून ते चांगले काम करत आहेत. पण, कमिशनबाजीमुळे कामे पुढे ढकलणे सुरु आहे. शहरात स्वच्छता नाही, झाडे झुडपे वाढली आहेत. उदयनराजे आणि मी राहातो, त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आता प्रशासक असल्यावरही त्यांनी समस्या सोडवण्यासाठी आले पाहिजे. पालिका प्रशासनावर कोणीतरी लक्ष ठेवले पाहिजे. पाच वर्षे सतेत ही मंडळी होती. आता सत्ता गेली की हात झटकून बसले आहेत,” असा हल्लाबोलही शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर केला आहे.