सातारा नगरपालिका निवडणुक जवळ येताच खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ग्रेडसेपरेटरचं श्रेय मिळालं नाही म्हणूनच आमदारांचा जळफळाट झालाय. त्यांच्या ग्रेडसेपरेटरच्या कोल्हेकुईमुळे त्यांना थोडं तरी समाधान मिळत असावे, असा टोला उदयनराजेंनी लगावल्यानंतर यासंदर्भात स्पष्टीकरणही जारी केलं. भ्रष्टाचाऱ्यांनी नगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असून त्यात काही तथ्य नशल्याचं उदयनराजे यांनी कोणाचे थेट नाव न घेता म्हटलं होतं. मात्र या वक्तव्यावरुन त्यांनी प्रत्यक्षरित्या शिवेंद्रराजेंना टोला लगावल्याची चर्चा दिवसभर प्रसारमाध्यमांमध्ये रंगली. या साऱ्या प्रकरणानंतर उदयनराजेंनी मी व्यक्तिगत किंवा संस्थेचं नाव घेतलं नसताना, त्यांनी आपल्या अंगावर ओढवून घेतलं आहे. याचाच अर्थ दाल मे कुठ काला नव्हे सब कुछ काला है असं म्हणत शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. मात्र आता या स्पष्टीकरण पत्रकावर शिवेंद्रराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवेंद्रराजेंचा टोला
“खासदार उदयनराजे यांनी माझं नाव आणि अजिंक्यतारा कारखान्याचे नाव घेऊन उल्लेख केला हे सर्व चॅनेल वर चालू होतं. त्यावेळी मी प्रतिक्रिया दिल्यावर उदयनराजेंना जास्त झोबलं म्हणून त्यांनी स्पेशल माघार घेतल्याचे पत्रक काढलं. एखादं वक्तव्य ठरल्याप्रमाणे अगोदर बोलायचं आणि नंतर माघार घ्यायची आणि मी बोललोच नाही म्हणायचं,” असे सांगत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधलाय. “मी स्वतःहून उदयनराजेंना कधी बोललो नाही पण ते जर बोलले तर त्याला उत्तर देणे मला क्रमप्राप्त आहे. “उदयनराजेंनी बोलताना विचार करावा,” असा चिमटा देखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काढलाय.

उदयनराजेंनी पत्रकात काय म्हटलं होतं?
सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मूलतत्त्व आहे. सहकारी तत्त्वांना तिलांजली देत महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कशा गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले आहेत त्याची फक्त जाहीर वाच्यता केली. या वाच्यतेमध्ये कोणत्याच आमदारांचे किंवा कोणत्या कारखान्याचा नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता. तथापी खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे. सहकारी संस्थांविषयीचे आमचे वक्तव्य फक्त त्यांनाच झोंबले, असं उदयनराजेंनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं होतं.

५० कोटींच्या प्रकल्पांबद्दल समाधान
शिवेंद्रराजेंनी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या ५० कोटींच्या वॉटर स्पोर्ट्स प्रकल्पाबद्दलही समाधान व्यक्त केलं. “राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. यामध्ये कोयना जलाशयावर जावळी तालुक्यात वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय अजित पवारांनी जाहीर केली. मी पाठवलेल्या पत्रासंदर्भात १५ ते २० दिवस आधी मुंबईत सचिवालयात बैठक झालेली. या बैठकीत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, जिल्हाधिकारी, एमटीडीसीच्या एमडी, अर्थ आणि नियोजनचे सचिव, जलसिंचनचे सचिव हे अधिकारी उपस्थित होते. या जलाशयावर पर्यटनाच्या हिशोबाने कोयानामध्ये वॉटर स्पोर्ट्स कसं चालू शकतो याबद्दल चर्चा झाली. यासंदर्भातील प्रेझेन्टेशन आम्ही केलं. तर अजित पवारांनी ५० कोटींचा प्रकल्प मान्य केला,” असं शिवेंद्रराजे म्हणाले.