“संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहिती आहे. सर्वांनी छत्रपती संभाजी राजांचा ठरवून गेम केला,” अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यातून त्यांनी शिवसेनेसह संभाजीराजेंना पाठिंबा न देणाऱ्या पक्षांवर नाव न घेता निशाणा साधला. छत्रपती संभाजीराजेंनी सर्व राजकीय पक्षांना पाठिंब्याचं आवाहन केलं होतं. मात्र, सर्व पक्षांकडून त्यांना डावलले जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात ही प्रतिक्रिया दिली.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “मराठा समाजाने संभाजीराजेंच्या पाठीशी खंबीर उभे राहावे आणि छत्रपती संभाजीराजेंनीं मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे. छत्रपती संभाजीराजे हे आमच्या छत्रपती कुटुंबातील आहेत. मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे. मात्र, संभाजीराजांचं मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण यामध्ये फार मोठे काम आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले. यावेळी त्यांची खासदारकी गेली असेल, पण योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा ते पारखून निर्णय त्यांनी घ्यावा.”
“छत्रपती संभाजीराजे यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे पोहोचून त्यांनी मराठा समाजात जागृती केली. समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले. संभाजीराजांच्या पुढील कारकिर्दीत मराठा समाजाने त्यांच्यासोबत रहावे. समाजासाठी स्थापन केलेल्या सकल मराठा संस्थेनेही त्यांच्या पाठीशी राहावे. कारण त्यांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे,” असं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं.
संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास त्या पक्षात जाणार का? शिवेंद्रराजे म्हणाले…
संभाजीराजे छत्रपतींनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास तुम्ही त्यांच्या पक्षात जाणार का? असा प्रश्न विचारला असता, शिवेंद्रराजे म्हणाले, “मी आत्ता भाजपचा आमदार आहे. ज्या पक्षाबरोबर मी आहे त्यांच्याबरोबर राहणे चांगले. उगाच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणे योग्य ठरणार नाही.”