सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या काळात सातारा नगरपालिकेच्या टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच या भ्रष्टाचारातून सातारा विकास आघाडीच्या पार्टीला पार्टी फंड द्यावा लागेल अशी जाहीर मागणी एका अधिकाऱ्याने ठेकेदाराकडे केल्याचा दावा केला. शिवेंद्रराजे भोसलेंनी भर पत्रकार परिषदेमध्ये ही ऑडिओ क्लिप सर्व पत्रकारांना ऐकवली. तसेच उदयनराजेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “उदयनराजे धादांत खोटं बोलले. त्यांचेच अधिकारी पाच टक्के ‘पार्टी फंड’ मागत आहेत. कोणता पार्टी फंड? कोण मागत आहे, कुणासाठी मागत आहे? हे पाहिलं पाहिजे आणि मग कुणाचा कडेलोट करायचा ते ठरवलं पाहिजे. असे अनेक लोक आहेत.”

“नगरपालिकेत केवळ ठेकेदारांचे बिल काढण्याची कामं होतात”

“उदयनराजे कुणाचा कडेलोट करतील की नाही करणार माहिती नाही, पण आगामी नगरपालिका निवडणुकीत सातारकर उदयनराजेंच्या आघाडीला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तूस्थिती आहे आणि हे लक्षात आल्यामुळे नैराश्येतून हे सगळं सुरू आहे. त्यांना कळालं आहे की, आपण पाच वर्षे वाया घालवली. नगरपालिकेत केवळ ठेकेदारांचे बिल काढणे, चेक काढणे एवढीच कामं होत आहेत,” असा आरोप शिवेंद्रराजेंनी केला.

“..मग आरोपांवरून इतका तिळपापड का होतो”

शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, “लोकांमध्ये उदयनराजेंची आधीची प्रतिमा राहिलेली नाही. त्यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार, सर्वसामान्य स्त्रीला अधिकार अशा गोष्टी सांगितल्या. यातलं त्यांनी काहीही केलं नाही. आता त्यांना आगामी निवडणुकीत घरी बसण्याची वेळ येणार आहे. हे म्हणतात ५० नगरसेवक निवडून आणू. एवढी जिंकण्याची खात्री आहे, तर मग आरोपांवरून त्यांचा इतका तिळपापड का होत आहे?”

हेही वाचा : “…मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?”, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“सातारा नगरपालिकेतून यांचा १०० टक्के कडेलोट होणार”

“उदयनराजेंनी खूप सुंदर काम केलं आहे, तर घाबरण्याचं काम काय? सातार विकास आघाडीचं नगरपालिकेतील राजकारण संपुष्टात आलं आहे. फक्त निवडणुकीची वेळ यायची राहिली आहे. नंतर सातारा नगरपालिकेतून यांचा १०० टक्के कडेलोट होणार आहे,” असं म्हणत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना टोला लगावला.

Story img Loader