सातारा : ‘मी माझ्याच गाडीतून फिरत असतो. मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. महाराष्ट्रात छत्रपती घाबरायला लागले, तर अवघड व्हायचं,’ अशा शब्दांत छत्रपती घराण्याचा अभिमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखवून दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली. आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी, मी महामार्गाची पाहणी केली असल्याचे सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मुंबई-गोवा हायवेचे २०११ पासून काम सुरू आहे. या कामास विलंब झाला आहे. कोकणातील बरेच लोक मुंबईस वास्तव्यास असून त्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करत आहेत. त्यांच्या दृष्टीने हा महामार्ग महत्त्वाचा ठरतो. राज्याच्या विकासात या महामार्गाचा मोठा वाटा आहे. मी स्वतः या महामार्गाची पाहणी केली आहे.’

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘भास्करराव, मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. माझी स्वतःची गाडी आहे. या गाडीतून फिरण्याची माझ्यात ताकद आहे. मी स्वतः या महामार्गाची पाहणी संबंधित लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन केली. भास्करराव जाधव यांनाही त्या वेळी भेटायचं होतं हे तुम्हालाही माहिती आहे. यामध्ये घाबरण्यासारखा विषय नाही. महाराष्ट्रात छत्रपतीच घाबरायला लागले, तर अवघड व्हायचं. उशीर झाल्यामुळे आपली भेट झाली नाही.”

“चिपळूण पुलाचे ५० टक्के काम झाले असून, ते काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. सध्या गर्डर लँाचिंगचे काम सुरू आहे. जानेवारी २०२६ अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करणार, असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सभागृहास दिले. ठेकेदाराच्या चुकीमुळे काम पुन्हा करावे लागत असल्याने ही कामे ठेकेदाराकडूनच करवून घेतली जात आहेत. त्यासाठी शासन वेगळा खर्च करणार नाही.”