छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य आणि देशाचे दैवत आहे. शिवप्रेमी व सर्वस्तरांमध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणीही विधान करताना जबाबदारीने आणि विचारपूर्वकच करणे गरजेचे आहे, असं म्हणत याबाबत राज्यपालांनी ताबडतोब खुलासा करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
राज्यपालांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला असून खासदार उदयनराजे यांनी ट्विट करत, राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. तर, आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे व देशाचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल समाजाच्या भावना तीव्र आहेत. कोणीही महाराजांच्या बद्दल वक्तव्य करताना ते जबाबदारीने विचारपूर्वक केले पाहिजे. आपल्या वक्तव्याचा समाजावर काय परिणाम होतो? याचाही विचार संबंधितांनी करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या सांगण्यावरून केली हे बोलणे किंवा भाषणामध्ये सांगणे चुकीचे आहे. त्यांची घडवणूक व त्यांच्यावर संस्कार हे राजमाता जिजाऊंनी केले आहेत. त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ आहेत इतिहासाने तसे दाखले दिले आहेत. त्यामुळे असे वक्तव्य करणे हे वेदनादायक आहे.”, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.
तसेच, “राज्यपालांनी याबाबत ताबडतोब खुलासा करावा. सर्व महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले आहेत. राज्यपालांचा खुलासा येणे गरजेचे आहे आणि या वादावर पडदा ताबडतोब पडणे ही अपेक्षित आहे.” असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.