हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, रयतेचे वाली असणारे महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली. शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे. म्हणूनच महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकानचं या राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.