वरकरणी मितभाषी, निष्कलंक, निर्मळ अशी प्रतिमा असणारे पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील- चाकूरकर नव्याने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने उस्मानाबाद आणि बिदर या दोन मतदारसंघांवर त्यांचे लक्ष आहे.
काँग्रेसमधील नेत्यांना राज्यपालपदी नियुक्ती दिल्यानंतरही राजकारणात त्यांना पुन्हा सक्रिय होण्याची संधी दिली जाते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे त्याचे अलीकडचे उदाहरण. ते आंध्रचे राज्यपाल होते. पक्षश्रेष्ठींनी त्यांची इच्छा लक्षात घेऊन त्यांना पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिली. ते आता केंद्रीय गृहमंत्री आहेत. चाकूरकरांचीही मनोमन अशीच इच्छा आहे. आठ-दहा दिवसांच्या सुट्टय़ा काढून त्यांनी कार्यकर्ते पुन्हा जोडायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केंद्रातल्या दिग्गजांना लातूरमध्ये ते आवर्जून बोलावत आहेत. त्यांच्यातील हे बदल ते मतदारसंघ शोधासाठी असल्याचे आवर्जून सांगितले जाते.
चार महिन्यांपूर्वीच दहा दिवसांच्या लातूर दौऱ्यावर आलेले चाकूरकर या वेळी पुन्हा आठवडाभराच्या सुट्टीवर आले. पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर ते राजकीय निवृत्ती स्वीकारतील, असे त्यांच्या जवळच्या मंडळींचे म्हणणे होते. मात्र, विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर चाकूरकर पुन्हा सक्रिय होऊ इच्छितात. त्यांचे कार्यकर्ते ‘साहेब’ आता ‘सक्रिय’ होणार, असे सांगत असून उतरंडीला पडलेल्या कार्यकर्त्यांनाही हुडकून काढत आहेत. राष्ट्रपती लातूरला यावेत, यासाठी चाकूरकरांनी मनापासून प्रयत्न केले. राष्ट्रपतींचा कार्यक्रम ‘नीटनेटका’ व्हावा, यासाठी ते दोन दिवस अगोदर लातुरात आले. चाकूरकरांचे विमानतळावर स्वागत केलेले छायाचित्र वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी देण्यात आले. यापूर्वी चाकूरकर केव्हा लातुरात आले व केव्हा ते पंजाबकडे गेले याचा थांगपत्ताही लागत नसे.
गेल्या सुट्टीत त्यांनी उस्मानाबाद मतदारसंघाचाही दौरा केला. एका सहकारी साखर कारखान्याला आवर्जून भेट दिली. उस्मानाबादेत राजकीय मंडळींच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर जसे लक्ष आहे तसेच बिदर लोकसभा मतदारसंघावरही डोळा आहे. चाकूरकरांचे पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्हय़ावरही वजन होते. विशेषत: उमरगा तालुका हा त्यांचा बालेकिल्ला होता. आजही त्यांचे समर्थक बसवराज पाटील यांचा या तालुक्यात दबदबा आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील औसा व उमरगा विधानसभा या दोन मतदारसंघात त्यांना चांगले मताधिक्य मिळू शकते. या जोरावर राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद मतदारसंघ चाकूरकरांसाठी खुला केला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुढच्या आठवडय़ात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्यामुळे या विस्तारात साहेबांचे नाव नक्की, असा दावाही त्यांचे काही समर्थक करीत आहेत. लातुरात ‘मोठे साहेब’ म्हणजे विलासराव असे अघोषित ठरलेले होते. आता मोठय़ा साहेबांची जागा चाकूरकरांनी घेतली असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
लातूर शहरातील चाकूरकर यांच्या निवासस्थानाचे नाव ‘देवघर’ असे आहे. चार वर्षांपूर्वी या निवासस्थानातून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याचा घाट घातला गेला. चाकूरकर समर्थकांनी देवघरातून काँग्रेसला देवाघरी पाठवण्याची व्यूहरचना आखली होती. तीच मंडळी आता पुन्हा नव्याने चाकूरकर सक्रिय राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू करीत आहेत.
पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर हे ८० व्या वर्षांच्या उंबरठय़ावर आहेत. चाकूरसारख्या छोटय़ा गावात जन्मलेल्या शिवराज पाटलांनी आपले नाव देशपातळीवर केले. लातूरच्या नगराध्यक्षापासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने गाजली. चाकूरकर त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत, असे त्यांना ओळखणाऱ्या अनेकांचे मत आहे. दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करीत व लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसाय करून सरळधोपट मार्गी जीवन व्यतीत करण्याचा त्यांचा इरादा होता. पण मित्रांच्या आग्रहाखातर लातूर नगरपालिकेची त्यांनी निवडणूक लढवली व त्यानंतर राजकीय कारकिर्दीतील यशाने त्यांची संगत धरली. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती या चढत्या क्रमानंतर खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द गाजतेच आहे. वरकरणी ते निवृत्तीची भाषा बोलत असले, तरी त्यांचे अंतर्मन लोकसभा मतदारसंघाच्या शोधात आहे. चाकूरकर वरून अध्यात्म बोलतात. ते कधी अंतराळात रमतात, तर कधी विज्ञान-तंत्रज्ञानावर बोलतात. त्यांचे वरून अध्यात्म आणि आतून राजकारण असे सारे सुरूच असते. या दौऱ्यात लातूरकरांनी पुन्हा एकदा हा अनुभव घेतला.

कार्यक्रम तसा गौणच!
राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर दयानंद शिक्षण संस्थेने सुमारे सव्वा कोटी, लातूर महापालिकेने अंदाजे ७० लाख तर सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे अडीच कोटी रुपये खर्ची घातले. याव्यतिरिक्तही बराच खर्च झाला, पण तो गुलदस्त्यात आहे. या कार्यक्रमासाठी लातूरला आलेल्या राष्ट्रपतींनी एक दिवस मुक्काम केला. या दौऱ्यात चाकूरकरांच्या घरी भोजन घेण्याची राष्ट्रपतींची इच्छा होती. कार्यक्रमाचा भाग तसा गौण असल्याचा दावा चाकूरकर समर्थक करतात.

Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Manoj Jarange Patil, Maratha Andolan,
जरांगेची मतपेढी अपक्षांच्या पाठीशी ?
maharashtra vidhan sabha election 2024 mva mahayuti involved in discussion with rebels for damage control in amravati assembly elections
बंडखोरांना थोपविण्यासाठी चर्चा, भेटींचे सत्र; वणी, उमरखेड, यवतमाळमध्ये बंडखोर माघार घेण्याची शक्यता नाही