ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (२१ जून) या तिथीप्रमाणे रायगड जिल्हा परिषद, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व कोकणकडा मित्र मंडळातर्फे किल्ले रायगडावर ३४० वा शिवराज्याभिषेक दिन हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा करण्यांत आला. गेले दोन दिवस गडावर राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा  गुरुवारपासून सोहळय़ाच्या पूर्वसंध्येपासून करण्यात आली. संध्याकाळच्या मंगलमय वातावरणामध्ये थंडगार वाऱ्याची झुळूक, दाट धुक्याचे वातावरण, मधूनच पावसाची रिपरिप अशा आल्हादायक उत्साही वातावरणात गडावर आलेले हजारो शिवभक्त छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत होते. जगदीश्वर मंदिरात मंत्रघोषामध्ये अभिषेक सुरू झाला. तर बाहेर प्रत्यक्ष निसर्गानेदेखील पावसाची संततधार सुरू करून अभिषेक सोहळय़ाला सुरुवात केली.
जगदीश्वर मंदिर ते दरबार हॉलपर्यंतचा मार्ग फुलांनी सजविण्यात आला. आज पहाटे ब्रह्मवृदांच्या मंत्रघोषात महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सिंहासनाधिष्ठित करण्यात आली. त्यानंतर मेघडंबरीतील  महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्णमुद्राभिषेक करण्यात आला. त्याच वेळी किल्ले रायगडावर जयघोष सुरू झाला आनंदी वातावरणात पारंपरिक वेशभूषा केलेले मराठमोळे शिवभक्त याची देही याची डोळा तो क्षण मन भरून पाहत होते. ढोल, नगारे, फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली गड दुमदुमून गेला. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. मुसळधार पाऊस, जीवघेणी थंडी असूनही हजारो शिवभक्तांनी किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळय़ाला उपस्थिती लावली त्याबद्दल आमदार गोगावले यांनी साक्षात दंडवत केला. ज्याप्रमाणे विठुरायाची पंढरपूर-आळंदीची वारी आपण कधीही चुकवीत नाही तशीच किल्ले रायगडाची वारी शिवभक्तांनी कधीही चुकवू नये असे नम्रतेचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती कविता गायकवाड, उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, रायगडचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख बिपीन महामुणकर, कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे सदस्य यांच्यासह हजारो शिवभक्त उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा