कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्यण घेतल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आज त्यांच्या घरावर मोर्चा काढला. ”खासदार माने यांनी गद्दारी केली असून गद्दारांना क्षमा नाही”, अशी टीका यांनी शिवसैनिकांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील घराबाहेर पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ दोन्ही खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आज धैर्यशील माने यांच्या घरावर आज मोर्चा काढला. यावेळी माने यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ”धैर्यशील माने यांची लायकी नसतानाही उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला. शेकडो शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करत यांना निवडून दिले. मात्र, तरीही ते शिंदे गटात गेले. ही गद्दारी आहे आणि गद्दाराला क्षमा नाही”, अशी टीका यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.
हेही वाचा – बंडखोरांना उंदीर म्हणणारे अर्जून खोतकर शिंदे गटात जाणार का? एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर म्हणाले, “हे खरं आहे…”
यासंदर्भात धैर्यशील माने यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. ”शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमकं हे का घडलं? कशामुळे घडलं? यासाठी त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याचे उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारे शिवसैनिक हे आपलेच बंधू-भगिनी आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे त्यांचा सहकारी म्हणून माझे कर्तव्य आहे” असे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.
“अधिवेशन असल्यामुळे मी दिल्लीत आहे. मतदारसंघात आल्यानंतर वस्तुस्थितीबाबत, माझ्या भूमिकेबाबत मी प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करेन, तोवर संयम राखून मतभेद होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, मोर्चाला कुठलाही प्रकारचा प्रतिकार किंवा प्रतिवाद होता कामा नये. तसेच प्रशासनानेही मोर्च्याला सरकार्य करावे”, असे आवाहनही त्यांनी केले आहे.