राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं आणि शिवसेना कोणाची यावरून सवाल उपस्थित झाला. यावरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावरून आता मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर आनंद साजरा करत एकमेकांना पेढे भरवले आहेत. यावेळी शिवसेनेच्या वाघिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. “शिवसेनेकडून लागलेला निकाल हा शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देऊ इच्छिते की, आपण चित्त्याचा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. आता वाघाचा फोटो काढण्यासाठी मुंबईत शिवतीर्थावर या,” असे या महिला शिवसैनिकानं म्हटलं आहे. त्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादाचा दसरा मेळाव्याच्या आयोजनाशी संबंध नाही, असं सांगत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा हस्तक्षेप अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.
“बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचा आणि मातोश्रीशी निष्ठावंत…”
“उद्धव ठाकरेंच्या संयमाचा हा विजय आहे. उद्धव ठाकरे विनम्रपणे सांगते होते, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी क्षणोक्षणी दिसत होता. आमच्या परंपरेचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचा आणि मातोश्रीशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे,” असं उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.