शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या प्रकरणाच्या तपासानंतर निष्कर्ष सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम.जी.एम रुग्णालयात भेट दिली होती. मेटेंच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले होते.
कार्यकर्त्याच्या दाव्यानंतर विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंनी व्यक्त केला संशय | Vinayak Mete
दरम्यान, याप्रकरणी मेटेंच्या गाडी चालकाची चौकशी करण्यात आली आहे. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती यांनी चालकासंदर्भात बोलताना केलेले विधान प्रकरणाचे गूढ वाढवणारे आहे. चालक अपघाताचे ठिकाण सांगत नव्हता, असे ज्योती यांनी म्हटले आहे. सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही त्यांनी केला होता.