शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला आहे. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व घडामोडीनंतर विनायक मेटे यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघाताची घटना घडल्यानंतर नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि वैद्यकीय टर्मीनोलॉजीच्या आधारे त्यांनी विनायक मेटेंच्या निधनाबाबत संशय व्यक्त केला आहे. ज्योती मेटे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा मी अक्षरश: धावत सुटले. मी विश्वास नांगरे पाटलांना फोन केला, माझा भाऊदेखील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहे, मी त्यालाही फोन केला. पण दोघांनीही कॉल उचलला नाही.”

“शेवटी मी वाहतूक पोलिसांना फोन केला. कारण चालक मला सांगत नव्हता की तो नेमका कुठे आहे? त्याला नेमकं ठिकाण सांगता येत नसेल, तर तू व्हॉट्सअॅपवर लोकेशन पाठव… असं मी त्याला सांगत होते. पण त्याने तसं केलं नाही. शेवटी मला वाहतूक पोलिकांकडूनच कळालं की साहेबांना एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केलं आहे. मी रुग्णालयात पोहोचेपर्यंत तेही तिथे पोहचले होते.”

हेही वाचा- विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; मराठा समाजाचा आवाज उंचावणारा नेता हरपला; आज अंत्यसंस्कार

ज्योती मेटे यांनी पुढे सांगितलं की, “मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं. रुग्णालयात गेल्याबरोबर मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले. त्याठिकाणी डॉक्टरही होते, त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितलं. पण मी विनायक मेटेंची बायको आणि डॉक्टर असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. मी साहेबांच्या हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण ती हाताला लागली नाही. ईसीजीमध्येही कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या.”

हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग धोक्याचा ; साडेचार वर्षात ४०० जणांचा मृत्यू

“त्यानंतर मी माझ्या भावाला सांगितलं की, हे थोड्या वेळापूर्वी घडलेलं नाही. मला फोन आल्यानंतर मी जवळपास पाऊण तासात याठिकाणी पोहोचले. पण ही पाऊण तासांपूर्वी घडलेली घटना नव्हती, ही घटना घडून किमान दोन तास उलटले होते, म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवलं जात होतं. कदाचित ते लपवतही नसतील, मीच भयाकुल असेल, नेमकं काय असेल? हे मला माहीत नाही. पण मला फोन येण्याअगोदर अपघाताची घटना घडून खूप वेळ झाला होता. या सर्व बाबी आता शवविच्छेदन अहवालातून समोर येतील, मृत्यूची नेमकी वेळही समजेल” असंही ज्योती मेटे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsangram leader vinayak mete death wife and doctor jyoti mete statement on accident rmm