शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती निधन झालं. या प्रकरणाच्या पोलीस तपासाला वेग आला असून हा खरोखर अपघात होता की घातपात या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे या अपघातामध्ये गाडीने प्रवास करत असलेल्या तिघांपैकी दोघे जण बचावले असून मेटे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या अपघातासंदर्भात संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता पोलिसांनी अपघात झाला त्यावेळी गाडी चालवत असणाऱ्या मेटेंच्या चालकाचीही आज चौकशी केली. चालक एकनाथ कदम याचा जबाब आज पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी चालकासंदर्भात बोलताना केलेलं विधानही प्रकरणाचं गूढ वाढवणारं आहे.
विनायक मेटेंचा अपघात हा घातपात तर नाही या दृष्टीकोनाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मेटे यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण खोपोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. गाडी चालवत असलेला आणि सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असणारा मेटे यांचा चालक एकनाथ कदम यांची चौकशी आज खोपोली पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांनी रुग्णालयामध्ये जाऊन एकनाथ कदमचा जबाब आज नोंदवला.
दरम्यान दुसरीकडे मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी चालक अपघाताचं ठिकाण सांगत नव्हता असं म्हटलं आहे. सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. “अपघात झाल्याचं समजल्यानंतर तो नेमका कुठे झालेला आहे त्याचं ठिकाण मला कोणीही सांगत नव्हतं. ड्रायव्हरशी बोलण्याचा प्रयत्न केला. तो ते ठिकाण सांगू शकत नव्हता,” असं ज्योती यांनी म्हटलं आहे. “तो ड्रायव्हर गेली काही वर्षं साहेबांसाठी (मेटेंसाठी) काम करत आहे. तो या मार्गावर सातत्याने साहेबांबरोबर प्रवास करतो,” असंही त्या चालकासंदर्भात माहिती देताना म्हणाल्या.
“मी (रुग्णालयात) पोहोचल्यानंतर मला जी अपघाताची वेळ कळली होती त्या वेळेपेक्षा अगोदर साहेबांचा मृत्यू झालेला आहे हे मला लक्षात येत होतं. त्यामुळे कुठेतरी एक कडी मिसींग आहे. माझ्यापासून सत्य दडवलं जात आहे एवढं मला वाटतं होतं,” असंही ज्योती यांनी टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ –
अपघात कसा घडला?
मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.