पंजाब काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय कलहामुळे आख्ख्या देशात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? पक्षाचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राजीनामा देतात, केंद्रीय पातळीवर नेमकं नेतृत्व कुणाचं याविषयी प्रचंड संभ्रम, ज्येष्ठ नेते पक्षातल्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्याचं आयतं कोलित मिळालं तर त्यात नवल काहीच नाही. मात्र, काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने देखील आता काँग्रेसच्या चुका दाखवून त्यांना सल्ला दिला आहे. या परिस्थितीत काँग्रेसनं काय करायला हवं, हे शिवसेनेनं सांगतानाच भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाल्याचं सांगायला देखील शिवसेना विसरलेली नाही. पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं काँग्रेसविषयीची भूमिका मांडली आहे.

काँग्रेसची हालत पतली!

गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. “नरेंद्र मोदींच्या वादळापुढे भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली आणि काँग्रेसच्या वाड्यातले उरले-सुरले वतनदार देखील सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा मुळापासू हादरला आहे. कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पदावरून दूर केलं. प्रदेशाध्क्ष नवजोतसिंग सिद्धूंनी पेढे वाटत भागडा केला. पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढचं संकट वाढवलं. सिद्धूंच्या सततच्या कटकटीमुळे अमरिंदर यांना दूर केलं. आता सिद्धूही गेले काँग्रेसच्या हाती काय उरलं?” असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.

डोकंच नसेल, तर शरीराचा काय फायदा?

दरम्यान, पक्षनेतृत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं अग्रलेखातून काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “भाजपाकडे मंत्रीपदं वाटण्याची क्षमता आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणं म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे, त्यामुळे काँग्रेसचं काय होणार असा घोर लागलाय. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी सुरू असलेले उपचार चुकीचे आहेत का याचा विचार व्हायला हवा. काँग्रेसनं उसळी मारून उठावं, मैदानात यावं अशी लोकभावना आहे पण त्यासाठी काँघ्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“जर ते भारताबाहेर गेले असतील तर…”, परमबीर सिंह यांच्याविषयी राज्याच्या गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया!

अमरिंदरसिंग काँग्रेसला खड्ड्यात टाकतील..

दरम्यान, पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्याविषयी देखील शिवसेनेनं भूमिका मांडली आहे. “भाजपात जाण्याच्या शक्यतेला अमरिंदर सिंग यांनीच पूर्णविराम दिला आहे. पण आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील असं दिसत आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच, “अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषीमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ७५ वर्ष पूर्ण झालेल्यांना सत्तेचं पद मिळत नाही असं मोदींचं धोरण आहे. अमरिंदर सिंग यांचं वय ७९ आहे. त्यामुळे हे कसं होणार?” असं अग्रलेखात नमूद केलं आहे.

Story img Loader