सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कुणाचं? यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता निवडणूक चिन्हाबाबतची पुढील सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा शिंदे गटाला दिलासा मानला दात असताना शिवसेनेसाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी बघत होतो की काही ठिकाणी गद्दारांना दिलासा वगैरे म्हणत होते. पण हा दिलासा नाहीये. इथे फक्त युक्तिवादाचं कोर्ट बदललं आहे. आत्तापर्यंत जे सर्वोच्च न्यायालयात होत होतं, ते आता निवडणूक आयोगासमोर होणार आहे. ठीक आहे, तिथे युक्तिवाद सुरू राहील. सगळं काही जनतेच्या समोर होत आहे. हा युक्तिवाद फक्त शिवसेनेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी महत्त्वाचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“हा शिवसेनेला धक्का का मानावा? निवडणूक आयोग..”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची भूमिका!
“विजयादशमीला शिवसेनेचाही विजय”
“निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. विजयादशमीला सत्याचा विजय झाला तसाच शिवसेनेचाही विजय होणार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित नाही”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील नेतेमंडळींनी जल्लोष केल्याबाबत विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्र सोडलं. “गद्दारांच्या गटात जेव्हा शिवसेनेला थोडा धक्का बसला असं वाटतं, तेव्हा आनंद आणि जल्लोष केला जातो. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले, तेव्हाही आपण पाहिलं होतं की टेबलवर चढून ते नाचले होते. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित नाही”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं.