गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प आधी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कंपनीकडून तशी घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं खापर आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर फोडलं असून विरोधकांनी मात्र ही सत्ताधाऱ्यांची चूक असल्याचा दावा केला आहे. यात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एक ट्वीट करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात नव्या सरकारच्या झालेल्या बैठकांचा हवाला आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये दिला आहे.
नेमकं झालंय काय?
वेदान्ता-फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावमध्ये उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. सरकारकडून देखील यासंदर्भात पुढाकार घेऊन चर्चा सुरू होती. ठाकरे सरकारच्या काळातही यावर दोन्ही बाजूंनी चर्चेची फेरी पार पडली होती. त्यामुळे हा प्रकल्प राज्यात येऊन लाखो तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात असतानाच कंपनीकडून गुजरातला प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली. त्यावरून राज्यात वाद उभा राहिल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही गुंतवणूक करू, असं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं आहे. मात्र, त्यावरून विरोधकांचं समाधान झालं नसून शिंदे सरकारला लक्ष्य केलं जात आहे.
आदित्य ठाकरेंचं ट्वीट
यासंदर्भात निरनिराळे दावे केले जात असताना आदित्य ठाकरेंनी नव्या सरकारच्या यासंदर्भात झालेल्या बैठकीबाबतचा संदर्भ देऊन टीकास्र सोडलं आहे. “१५ जुलै २०२२ रोजी सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शक्य त्या सर्व सुविधा या प्रकल्पासाठी देऊ करण्यात आल्या. २५ व २६ जुलै रोजी यासंदर्भात विधिमंडळातही दावा करण्यात आला. प्रसारमाध्यमांना हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पण तरीही उद्योग विभागाला प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यात अपयश आलं. एक लाख रोजगार निर्मितीची संधी आपण गमावली”, असं आदित्य ठाकरेंनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हा प्रकल्प गेल्यानंतर उद्योगमंत्र्यांना माहितीही नव्हतं. हा माध्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच रत्नागिरीतील रिफायनरीबाबतही आम्ही लक्ष ठेवून आहोत. रिफायनरीच्या विरोधातील आणि समर्थनातील लोकांनी सर्व बाबी लोकांसमोर मांडायला हव्यात. त्यानंतर लोकांना ठरवू देत”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना दिली.
उदय सामंत यांचा दावा
आदित्य ठाकरेंनी याआधीही वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीका केली असून त्यावर बोलताना उदय सामंत यांनी आधीच्या सरकारवरच याचं खापर फोडलं आहे. “वेदान्त प्रकल्पाबाबत जानेवारी महिन्यातय चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर महाविकास आघाडीकडे सात महिन्यांचा काळ होता. कंपनीला किती पॅकेज द्यायचं याबाबतचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेण्याची गरज होती. पण ही समितीच १५ जुलै रोजी गठित झाली. त्यामुळे सात महिन्यांत ही समिती का गठित झाली नाही, याचं उत्तर आधी मिळायला हवं”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.