राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याची भूमिका जाहीर केली. यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली असून खुद्द मनसेमध्येच पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसेकडून दादरमध्ये शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवून थेट शिवसेनेलाच डिवचलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेनं शिवसेनेला डिवचलं!

आज रामनवमीच्या निमित्ताने सकाळीच मनसेनं शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालिसा लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. “ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व सोडून दिलं. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात”, अशा खोचक शब्दांत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेला आवाहन केलं. यानंतर किल्लेदार यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून अशाच प्रकारे भोंग्यांवर हनुमान चालिसा वाजवली जात आहे.

“स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”

दरम्यान, मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना मनसेच्या या कृतीवर निशाणा साधला आहे. “मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मनसेचं थेट शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा पठण; यशवंत किल्लेदारांसोबत कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

शिवसेना मस्जिद आहे का? आदित्य ठाकरे म्हणतात…

दरम्यान, मनसेकडून “शिवसेना भवन मस्जिद आहे का? असा प्रश्न करण्यात आलाय” अशी विचारणा पत्रकारांनी करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर खोचक टोला लगावला. “संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aaditya thackeray slams mns on hanuman chalisa loudspeaker bhavan pmw