वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी नेमकं कोण कारणीभूत ठरलं? यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आणि राज्यायचे उद्योगमंत्री व शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगला आहे. दोघांनीही राज्याच्या नुकसानाबद्दल एकमेकांना जबाबदार धरलं आहे. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे उदय सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं.
“एअरबस आणि टाटा हा एक मोठा प्रस्ताव आहे. याचा पाठपुरावा आपण करत आहोत. आम्हाला नागपूरमध्ये एअरबसची कंपनी आणायची होती. अगदी तीन दिवसांपूर्वी मी बोलेपर्यंत या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, उद्योगमंत्र्यांना एअरबस नावाचा प्रकल्प आहे हे माहितीही नव्हतं. आज म्हणतायत आम्ही एअरबस प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“हा प्रकार दुसऱ्या राज्यात घडला असता तर..”
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत यांचा राजीनामा घ्यायला हवा, असं आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात सूचित केलं. “उद्योगमंत्र्यांना माहिती नाहीये महाराष्ट्रात उद्योग किती आहेत. दुसरे एक मंत्री संजय राठोड आहेत. त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले. पण शपथविधी झाल्यानंतर आजही त्यांनी मंत्रीपदाचा पदभार घेतलेला नाही. काम सुरू केलेलं नाही. असे मंत्री मंत्रिमंडळात का आहेत? अनेत मंत्र्यांनी बंगले घेतले, पदं घेतली आहेत. पण महाराष्ट्रात अजून पालकमंत्री जाहीर झाले नाहीयेत”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
“वेदान्तामधून एक लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार होती. त्यातून १ लाख रोजगार महाराष्ट्रात येणार होते. जूनमध्ये सुभाष देसाई दिल्लीला गेले. फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींना भेटले. तेव्हा तळेगावमध्येच कंपनी येणार हे निश्चित करण्यात आलं. त्यानंतर सरकार पडलं. १५ जुलैला उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन सगळं ठरलं. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातला गेला. ज्या मिनिटाला उद्योगमंत्र्यांना पत्रकारांनी विचारलं की वेदान्तचा प्रकल्प गेला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले मी माहिती घेऊन सांगतो. मी ३२ वर्षांचा तरुण असूनही सरकारमधून बाहेर पडल्यानंतर एवढी माहिती देऊ शकतो, मग उद्योगमंत्र्यांकडे यासंदर्भात माहिती का नसावी?”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
“आता कदाचित म्हणतील आदित्य ठाकरे निळा शर्ट…”
दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांकडून बंडखोरीसाठी देण्यात आलेल्या कारणांचाही समाचार घेतला. “आधी त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमुळे आम्ही बाहेर पडलो. मग सांगितलं निधी मिळत नव्हता म्हणून बाहेर पडलो. मग सांगितलं हिंदुत्वासाठी तिकडे गेलो. मग सांगितलं भगव्या झेंड्याकडे गलो. आता कदाचित सांगतील आदित्य ठाकरे गणपतीत कुर्ते घालत होते, आता निळा शर्ट पुन्हा घालायला लागले म्हणून आम्ही नाराज आहोत. यांना नेमकं काय बोलायचंय हे मला माहिती नाही. यांचं हिंदुत्व खोटं हिंदुत्व आहे”, असं ते म्हणाले.